‘इस्लाम’ परकीय आक्रमकांसमवेत भारतात आला’, हा इतिहास आहे तसा सांगणे आवश्यक ! – मोहन भागवत, सरसंघचालक, रा.स्व. संघ

ब्रिटिशांनीच हिंदू-मुसलमान यांच्यात फूट पाडली !

मोहन भागवत, सरसंघचालक, रा.स्व. संघ

मुंबई – मुसलमान समाजातील समजूतदार आणि विचारी नेत्यांनी आततायी अन् उथळ वक्तव्यांचा विरोध करायला हवा. त्यांना हे काम दीर्घकाळ आणि प्रयत्नपूर्वक करावे लागेल. ही आपल्या सर्वांची मोठी परीक्षा असून त्यासाठी अधिक काळ द्यावा लागेल. ‘इस्लाम’ हा परकीय आक्रमकांसमवेत भारतात आला, हा इतिहास आहे आणि तो आहे तसा सांगणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी केले. ‘ग्लोबल स्टॅ्रटेजिक पॉलिसी फाऊंडेशन’च्या (जागतिक धोरणात्मक नीती संस्थेच्या) वतीने मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्र प्रथम-राष्ट्र सर्वतोपरि’ या परिषदेत ते बोलत होते.

या परिषदेत केरळचे राज्यपाल अरिफ महंमद खान, काश्मीर केंद्रीय विद्यालयाचे कुलपती लेफ्टनंट जनरल सय्यद अटा हुसेन यांसह देशभरातील विविध मुसलमान संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या सर्वांशी भागवत यांनी संवाद साधला.

या वेळी मार्गदर्शन करतांना भागवत म्हणाले, ‘‘भारतात रहाणारे हिंदू आणि मुसलमान यांचे पूर्वज समान आहेत. मुसलमान नेत्यांनी केवळ मुसलमान नाही, तर भारताच्या वर्चस्वाचा दृष्टीकोन ठेवला पाहिजे. देशाची प्रगती आणि विकास साधण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृती म्हणजे ‘हिंदु’ ! ‘हिंदु’ ही जाती किंवा भाषावाचक संज्ञा नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रगती आणि विकास यांसाठी मार्गदर्शन करणारी ही परंपरा आहे. ती मानणारा प्रत्येक भारतीय हा हिंदूच आहे.’’

भागवत यांनी सांगितले, ‘‘ब्रिटिशांनी गोंधळ निर्माण करून हिंदू आणि मुसलमान यांना लढायला लावले. ब्रिटिशांनी मुसलमानांना सांगितले की, जर त्यांनी हिंदूंसमवेत रहाण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना काहीही मिळणार नाही. केवळ हिंदूंनाच निवडले जाईल. ब्रिटिशांच्या या धोरणामुळेच मुसलमानांना स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीसाठी प्रेरित केले.’’