|
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
मुंबई, ६ सप्टेंबर (वार्ता.) – ‘भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन होणार’, या संकल्पनेवर श्री गणेशाचे चित्र असलेले पारपत्र (पासपोर्ट) सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान करण्यात आल्याचे समोर आले आहे. या पारपत्रावर भाग्यनगर (हैद्राबाद) पारपत्र कार्यालयाचा शिक्का असून पारपत्र प्रदान अधिकारी म्हणून पी. कृष्णा चार्या यांचे नाव आणि स्वाक्षरी आहे. हे पारपत्र विनोद म्हणून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे.
या पारपत्रावर श्री गणेशाचे चित्र प्रकाशित करून त्यावर राष्ट्रीयत्व ‘भारतीय’, जन्माचे ठिकाण ‘हिमालय’, रहाण्याचे ठिकाण ‘स्वर्ग’, यात्रा करण्याचे ठिकाण ‘मुंबई’, वडील ‘शिव’, माता ‘पार्वती’ आणि पारपत्राचा कालावधी ‘कायमस्वरूपी’, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
या पारपत्रावर प्रदान अधिकारी म्हणून पी. कृष्णा चार्या यांच्या असलेल्या नावाची निश्चिती करण्यासाठी, तसेच पारपत्रावरील त्यांची स्वाक्षरी आणि शिक्का यांविषयीची सत्यता पडताळण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने भाग्यनगर पारपत्र कार्यालयात ०४०-२७७१५३३३ या क्रमांकावर दूरभाषद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु संपर्क साधण्यात वारंवार येत असलेल्या अडथळ्यांमुळे बोलणे होऊ शकले नाही. याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने हैद्राबाद पारपत्र कार्यालयाच्या ‘[email protected]’ या अधिकृत ई-मेल पत्त्यावर पत्र पाठवून श्री गणेशाच्या करण्यात आलेल्या या विडंबनाविषयी स्पष्टीकरण देण्याचे आवाहन केले आहे.