सांगली उपनगरांमधील बससेवा तात्काळ चालू करा ! – भाजपची आगार नियंत्रकांकडे मागणी

आगर नियंत्रणप्रमुख सलगर (डावीकडे) यांना निवेदन देतांना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते

सांगली, ६ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनामुळे लागू केलेल्या दळणवळण बंदीनंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. असे असतांना सांगली शहरातील अनेक उपनगरांमधील बससेवा बंद अथवा अल्प प्रमाणात आहे. उपनगरामधील वयोवृद्धांना औषधे आणि उपचार घेण्यासाठी सरकारी रुग्णालयात जावे लागते, तसेच सामान्यांना कामासाठी शहरात यावे लागते. मुख्य शहरापासून उपनगरे लांब असल्याने शहरात जाण्यासाठी सकाळी ९ ते १०, तसेच परत येण्यासाठी सायंकाळी ५ ते ६ बससेवा चालू करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने आगार नियंत्रणप्रमुख सलगर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. (सर्वसामान्यांना येत असलेल्या अडचणी सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाच्या का लक्षात येत नाहीत ? त्यासाठी निवेदन का द्यावे लागते ? – संपादक)

या वेळी भारतीय जनता पक्ष सचिव विश्वजीत पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष कृष्णा राठोड, युवा नेते समीर भोसले, युवा मोर्चा प्रदेश सदस्य चेतन माडगूळकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमित देसाई हे उपस्थित होते.