‘मद्यबंदी’ समवेत मनोबल वाढवा !

प्रतिकात्मक छायाचित्र

नुकताच परभणी जिल्ह्यातील कमलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने मद्यबंदीचा ठराव संमत करण्यात आला. तसेच ‘कमलापूर गावाच्या परिसरात कुणीही मद्य विक्रेता मद्यविक्री करणार नाही’, असा निर्धार या वेळी करण्यात आला. उपस्थित सर्वच मद्य विक्रेत्यांनी यापुढे मद्यविक्री केल्यास कोणत्याही शिक्षेस सिद्ध असल्याचे सांगितले. मद्यबंदीचा निर्णय स्तुत्यच आहे; मात्र या निर्णयाची कार्यवाही काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. चंद्रपूरमध्ये मद्यबंदी करण्यात आली; पण पुन्हा अवैध मद्यविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्याच्या नावाखाली तेथील मद्यबंदी उठवण्यात आली. त्यामुळे ‘कमलापूर’ची स्थिती ‘चंद्रपूर’प्रमाणे होऊ नये इतकेच !


आतापर्यंत अनेक ठिकाणी मद्यबंदीसाठी महिलांनीच पुढाकार घेतलेला आहे. ‘चंद्रपूर जिल्ह्यात मद्यबंदी व्हावी’, यासाठी १ लाख महिलांनी १०० किलोमीटर पायी मोर्चा काढला, तर अनेक ठिकाणी महिलांनीच मद्याची दुकाने बंद पाडण्यास भाग पाडले. यावरून ‘मद्यपींमुळे कुटुंबांवर होणार्‍या परिणामांचे दायित्व केवळ महिलांवरच आहे का ?,’ असा प्रश्न पडतो. सुज्ञ पुरुषांसाठी ही गोष्ट लाजिरवाणी आहे. घरातील पुरुष व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक महिलांना संसार टिकवून ठेवण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागतो. मद्यपींमुळे कितीतरी संसार उद्ध्वस्तही झाले आहेत. व्यसनाधीनतेमुळे संपूर्ण कुटुंबव्यवस्थाच बिघडते. भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे लोटूनही महिलांना मद्यबंदीसाठी पुढाकार घ्यावा लागणे, तसेच त्यासाठी संघर्ष करावा लागणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र सुराज्य नसल्याने अद्यापही नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यातच व्यसनाधीनता ही एक गंभीर समस्या ! कोणत्याही समस्येच्या मुळावर घाव घालणे आवश्यक असते. मद्यबंदी घोषित झाली, तरी मद्यपींमध्ये घट होते किंवा ती पूर्णपणे यशस्वी होते, असे नाही, तर मद्यपी अवैध मार्गांचा अवलंब करतात. याचे कारण पुरुषांमध्ये मानसिक त्रासाला सामोरे जाण्याचे बळ न्यून असल्यामुळे ते व्यसनांचा आधार घेतात. व्यसनामुळे समस्येवर पांघरुण घातले जाते. त्याऐवजी मनोबल वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न केल्यास मद्यबंदीची समस्या लवकर सुटेल. यासाठी समाजाला धर्मशिक्षण देऊन साधना करण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे, हेच महत्त्वाचे ! हिंदु राष्ट्रामध्ये मद्यविक्रीच नसेल, हेही निश्चित !
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर