कोल्हापूर, ५ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे प्रतिक भगवा ध्वज आहे आणि त्यांचेच नाव या विद्यापिठाला आहे. त्यामुळे विद्यापिठात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या शेजारी मोठा भगवा ध्वज बसवावा, अशा मागणीचे निवेदन युवासेनेचे जिल्हाप्रमुख श्री. मंजित माने यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांना देण्यात आले. या वेळी सर्वश्री विनायक जाधव, सनराज शिंदे, शेखर बारटक्के, वैभव जाधव, अवदेश करंबे यांसह अन्य उपस्थित होते. (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी भगवा ध्वज फडकावण्यात यावा, अशी मागणी करणारे युवासेनेचे जिल्हाप्रमुख श्री. मंजित माने यांचे अभिनंदन ! वस्तूत: विद्यापीठ प्रशासनाच्याच हे लक्षात येऊन त्यांनी अगोदरच अशी कृती करणे अपेक्षित होते ! – संपादक)
कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण चालू असून यात काही गोष्टींचा समावेश होणे अत्यंत आवश्यक आहे. पुतळ्याकडे येण्यासाठी ४ वाटा असून प्रत्येक वाटेवर आत येतांना ‘क्यू.आर्. कोड’ लावावा. हा ‘कोड स्कॅन’ केल्यावर प्रत्येकाला त्याच्या भ्रमणभाषवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि पुतळा यांविषयी माहिती मिळावी. याच समवेत पुतळ्याच्या चबुतर्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा उमटावी. (छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास सांगावा यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी करावी लागणे हे दुर्दैवी आहे ! निधर्मी राज्यप्रणालीतील हाच सर्वात मोठा तोटा आहे ! – संपादक)