मुंबई – गणेशोत्सवात कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणार्यांवर धडक कारवाई करा, असे आदेश मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व पोलीस अधिकार्यांना दिले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त आणि पोलीस विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांच्या समवेत ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेतली.
‘देशात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी शारीरिक अंतर राखण्यासह अन्य दक्षताही घेणे महत्त्वाचे आहे. या १० दिवसांच्या कालावधीत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांच्या विरोधात कारवाई करतांना संकोच करू नका. धडक कारवाई करा’, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत.
गणेशोत्सवाच्या दृष्टीने शहरात सुरक्षाव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. ५ सहस्रांपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. संपूर्ण शहरात एकूण १३ विशेष पोलीस पथके तैनात करण्यात येणार आहेत. शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळे आणि मंदिरे यांना भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. ज्या भक्तांना मंदिर किंवा मंडळे यांना प्रत्यक्ष भेट द्यायची आहे, त्यांच्यासाठी टोकन यंत्रणा चालू करण्यात आली आहे.