श्रीराम मंदिराजवळ सार्वजनिक शौचालय बांधण्याचा जळगाव महानगरपालिकेचा धर्मद्रोही निर्णय !

हिंदुत्वनिष्ठ आणि स्वयंसेवी संघटना यांच्या वतीने महानगरपालिकेचा धिक्कार 

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

  • सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी जळगाव महानगरपालिकेला दुसरी जागा मिळाली नाही का ? अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांजवळ शौचालय बांधण्याचे धारिष्ट्य पालिकेने दाखवले असते का ?
  • हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करणार्‍या पालिकेला हिंदूंनी वैध मार्गाने खडसवायला हवे ! हिंदूंनी केवळ निवेदन देऊन न थांबता मंदिराजवळ शौचालय बांधण्याचे रहित होईपर्यंत प्रशासनाचा पाठपुरावा घेतला पाहिजे !

जळगाव, १ सप्टेंबर (वार्ता.) – येथील बस स्थानकासमोरील ग्रामदैवत प्रभु श्रीरामाच्या मंदिराजवळ सार्वजनिक शौचालय बांधण्याचा घाट महानगरपालिकेने घातला आहे. हा प्रकार अत्यंत घृणास्पद आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांची पायमल्ली करणारा आहे. महानगरपालिकेच्या या हिंदुद्रोही भूमिकेचा हिंदुत्वनिष्ठ आणि स्वयंसेवी संघटना यांच्या वतीने धिक्कार करण्यात आला. याविषयी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन शौचालय बांधण्यासाठी पर्यायी जागेची निवड करण्याची मागणी करण्यात आली. (हिंदूंच्या श्रद्धास्थानाच्या होणार्‍या अवमानाच्या विरोधात संघटितपणे आणि वैध मार्गाने आवाज उठवणार्‍या हिंदुत्वनिष्ठ अन् स्वयंसेवी संघटना यांचे अभिनंदन ! अशी मागणी करण्याची वेळ हिंदूंवर येते, हे संतापजनक – संपादक)

या निवेदनात ‘जळगाव शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची आवश्यकता आहेच, याविषयी दुमत नाही. तथापि या परिसरात भरपूर जागा उपलब्ध असतांना महानगरपालिका प्रशासनाचा त्याच जागेचा आग्रह का ?’ असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

या प्रसंगी ह.भ.प. योगेश महाराज, विश्व हिंदु परिषद जळगावचे जिल्हामंत्री श्री. देवेंद्र भावसार, बजरंग दल विभागाचे संयोजक श्री. राकेश लोहार, पंतप्रधान जन कल्याणकारी योजना प्रचार-प्रसार अभियानाच्या प्रमुख सौ. सुचित्रा महाजन, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ समितीचे सदस्य श्री. राहुल परकाळे, ‘जय भवानी ग्रुप’चे संस्थापक – अध्यक्ष श्री. यशाजी चव्हाण, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष श्री. गजानन माळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गजू तांबट, ‘महाराष्ट्र पोलीस बॉईज्’चे जिल्हा संघटक श्री. लतेश चौधरी, शिव तांडव ढोल पथकाचे श्री. सागर कापुरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. नितीन बिरारी, फुले मार्केट संघटनेचे श्री. राहुल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.