‘जागतिक’ हिंदुत्वाला संपवण्याचा डाव !

संपादकीय

जागतिक आकर्षणाचे केंद्र बनलेल्या हिंदुत्वाला विरोध करणार्‍यांचे पितळ उघडे पाडा !

प्रतिकात्मक छायाचित्र

गेल्या साधारण ३ आठवड्यांपासून ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या नावाने जागतिक (?) स्तरावर आयोजित एका कार्यक्रमाचा प्रचार करण्यात येत आहे. या माध्यमातून ‘हिंदुत्व’ हा जगाला धोका आहे’, असे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’च्या (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) माध्यमातून मानव, समाज आणि राष्ट्र यांना स्वार्थ त्यागून विश्वव्यापी बनवण्याची अलौकिक शिकवण देणार्‍या हिंदु धर्माला अशा प्रकारे विरोध करणे खरेतर या कार्यक्रमाच्या आयोजकांची बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट करणारा हास्यास्पद डाव आहे. कार्यक्रमाचा कालावधीही १० ते १२ सप्टेंबर २०२१ असा ठेवण्यात आला आहे. ९/११ (११ सप्टेंबर २००१) या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या अमेरिकेतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वरील जिहादी आक्रमणाला यंदा २० वर्षे पूर्ण होत आहेत. दोन दशकांआधी जिहादी आतंकवादाचे क्रौर्य आणि भयावहता यांचे आधुनिक काळातील स्वरूप पाहून संपूर्ण जग हळहळले होते. त्यानंतर अल्-कायदाच्या विरोधात अमेरिकेने मोहीम उघडून गेली २० वर्षे आपले सैन्य अफगाणिस्तानच्या भूमीवर खर्ची घातले. या २० वर्षांत लाखो कोटी रुपये खर्च करून जिथे इस्लामी आतंकवाद आणि तालिबान यांना संपवण्यात जागतिक महाशक्तीच्या पदरी अपयश आले, तिथे जगाचे हित चिंतणार्‍या हिंदुत्वाला संपवण्याचे कटकारस्थान का रचले जात आहे ? याचा विचार होणे आवश्यक आहे. जिहादी मानसिकता जगाला सतावत असतांना साम्यवादी, धर्मनिरपेक्षतावादी, पुरो(अधो)गामी यांना जागतिक स्तरावरील हिंदुत्व का सतावत आहे ?

‘हिंदुत्व’ हे जगात केंद्रस्थानी !

आज युरोप, अमेरिका येथे ख्रिस्ती धर्माला उतरती कळा लागली आहे. तेथील चर्च ओस पडत चालली आहेत. इस्लामच्या नावाने शांतीदूत जो हैदोस घालत आहेत, तो जगजाहीर आहे. इस्लामिक स्टेट, अल्-कायदा, बोको हराम, तालिबान, लष्कर-ए-तोयबा यांसारख्या जिहादी संघटना असोत की वहाबी, देवबंदी, सलाफी यांसारख्या काफिरांविषयी द्वेषभावना उत्पन्न करणार्‍या आणि शांतीदूतांना चिथावणी देऊन हातात शस्त्रे घेण्यास प्रवृत्त करणार्‍या जिहादी विचारसरणी असोत, हे सर्व जगाच्या नकाशावर इस्लामी सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. साम्यवाद भारतासह जगाच्या नकाशावरून पुसला जाण्याचा काळ येऊन ठेपला आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून भारत आणि त्याचा प्राण असलेला हिंदु धर्म यांसंदर्भात आकर्षण वाढत चालले आहे. तलवार, आमिषे यांच्या जोरावर नव्हे, तर त्याच्या अद्वितीय शिकवणीमुळे आज हिंदु धर्म हा जागतिक जिज्ञासेचा विषय बनला आहे. सहस्रो अमेरिकी आणि युरोपीय लोक हिंदु धर्माच्या शिकवणीला आपल्या जीवनात उतरवत आहेत अन् त्यांतून साधनेचा आनंद अनुभवत आहेत. अत्यंत गतीशील झालेल्या आजच्या युगात हिंदु धर्माने प्रदान केलेल्या ‘योगा’मुळे जग खर्‍या अर्थाने ‘वर्क-लाईफ बॅलेन्स’ (काम आणि जीवन यांच्यातील समतोल) अनुभवत आहे. वर्ष २०१४ मध्ये भारतात भाजपची सत्ता आल्यावर हिंदूंकडे आदराने पहायला आरंभ झाला आहे. एवढेच नाही, तर गेल्या काही मासांपासून युरोप आणि अमेरिका येथील हिंदूसंघटनाला जणू नवसंजीवनी मिळाली आहे. काही मासांपूर्वी ऑक्सफर्ड विद्यापिठात रश्मी सामंत नावाच्या एका हिंदु विद्यार्थिनीला विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष बनवण्यात आले होते. ती ‘हिंदु’ असल्याने तिला विद्यापिठातूनच मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि तिला अध्यक्ष बनू दिले गेले नाही. त्यानंतर पाश्चात्त्य देशांमध्ये उच्च शिक्षण घेणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांचे व्यापक संघटन होऊ लागले. ही जमेची बाजू आहे. एकूणच हिंदु धर्म वा हिंदुत्व हे ‘ग्लोबल सेंटर स्टेज’ (जागतिक केंद्रस्थान) बनत चालले आहे. हिंदु धर्माला आलेले सुगीचे दिवस पाहून हिंदुद्वेष्ट्यांना अजीर्ण झाले आहे. एकेकाळी साम्यवाद आणि धर्मनिरपेक्षता या विचारसरणी मुख्य प्रवाहातील म्हणजेच ‘मेनस्ट्रीम’ विचारसरणी असल्याचे समजले जात असे. हिंदुत्व आणि हिंदुत्वनिष्ठ यांना नेहमीच ‘फ्रिंज एलिमेन्ट्स’ (अत्यल्प जनाधार असलेले) म्हणून हिणवले जात असे. आज मात्र या हिंदुद्वेष्ट्यांना ते स्वत:च ‘फ्रिंज’ होतील कि काय ? याचे भय सतावू लागले आहे. त्यामुळेच जगातून हिंदुत्वाचे उच्चाटन करण्याची दिवास्वप्ने पाहिली जात आहेत. काहीही झाले, तरी अनादि काळापासून अस्तित्वात असलेल्या, अनंत काळापर्यंत टिकणार्‍या, चिरंतन आणि शाश्वत मूल्यांमुळे मानवाचा उद्धार करण्याचे सामर्थ्य असणार्‍या आणि सहस्रावधी वर्षे आक्रमणकर्त्यांच्या जाचाला पुरून उरणार्‍या एकमेव हिंदु धर्माला संपवण्यासाठी केले जाणारे सर्व प्रयत्न हे सूर्यावर थुंकण्यासारखे आहेत, हे जाणा !

हिंदूसंघटनाचा डंका पिटा !

प्रतिकात्मक छायाचित्र

हे सर्व असले, तरी हिंदु धर्माला संपवण्याच्या सुनियोजित षड्यंत्राला विरोध व्हायला हवा. ‘धर्माे रक्षति रक्षित: ।’नुसार (धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो.) ती हिंदूंची साधना आहे. यासाठी हिंदूंनी ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ यांसारख्या कार्यक्रमांच्या विरोधात वैध मार्गाने संघर्ष करायला हवा. या कार्यक्रमात बोलणार्‍यांची जंत्री ही एकजात पुरो(अधो)गामी आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी आहे. या सर्वांचे पितळ उघडे पाडणे आवश्यक आहे. यासाठी भारत, अमेरिका, युरोप येथील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना कार्यरत झाल्या आहेत. कोणत्याही युद्धामध्ये शत्रूची मानसिकता, बलस्थाने आणि धोरणे यांचा अभ्यास करणे आवश्यक असते. हिंदु विरोधकांच्या गोबेल्स प्रचारतंत्राला पायबंद करण्यासाठी जनजागृती आणि कृष्णनीती या ‘बौद्धिक’ शस्त्रांचा वापर करणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर हिंदूंचे दबावगट स्थापन व्हायला हवेत. यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, डॉक्टर, अभियंते, पत्रकार, अधिवक्ते, व्यापारी, प्रशासकीय अधिकारी, राजकारणी आदी स्तरांवर अभेद्य हिंदूसंघटन होणे काळाची आवश्यकता आहे. यातूनच ‘जागतिक’ हिंदुत्वाला संपवण्याचा डाव उधळला जाऊन ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल इस्लामिक कम्युनिस्ट जिहाद’ होणे शक्य होणार आहे, हे जाणा आणि हिंदूसंघटनाचा डंका पिटवून कामाला लागा !