परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सतत अनुसंधानात रहाणारे पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी आणि पू. गजानन साठे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

उतारवयातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सतत अनुसंधानात रहाणारे आणि ईश्वराप्रती दृढ श्रद्धा असणारे पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी आणि पू. गजानन साठे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पुणे, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – वयस्कर असूनही अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन सतत साधनारत रहाणे अतिशय अवघड असते. पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी (वय ७९ वर्षे) आणि पू. गजानन साठे (वय ७८ वर्षे) या दोन संतद्वयीनी तरुणांना लाजवेल, अशी साधना केलेली आहे. ते दोघेही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सतत अनुसंधानात असतात. ईश्वराप्रती तीव्र श्रद्धा कशी असावी ?, हे त्यांच्याकडून शिकायला हवे, असे गौरवोद्गार सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी काढले.

पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र भेट देऊन सन्मान करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये (डावीकडे)

२९ ऑगस्ट या दिवशी श्रीकृष्णजन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला ‘ऑनलाईन’ कृष्णानंद सोहळा पार पडला. या सोहळ्यात सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी श्रीमती उषा कुलकर्णी आणि श्री. गजानन साठे यांना संत घोषित करून सर्व साधकांना भावानंद दिला. ‘पुण्यनगरीला (पुणे) लाभलेल्या संतरत्नांच्या गुणांमधून कसे शिकायला हवे ?,’ याविषयी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांना ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाद्वारे मार्गदर्शन केले.

पू. गजानन साठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र भेट देऊन सन्मान करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये (डावीकडे)

या वेळी सनातनच्या ४८ व्या संत आणि पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांच्या विहीण पू. (श्रीमती) निर्मला दाते यांची वंदनीय उपस्थिती होती. तसेच पुणे जिल्ह्यात लेखाची सेवा करणार्‍या पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांच्या कन्या सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), जावई आधुनिक वैद्य (डॉ.) नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), पुत्र श्री. पराग कुलकर्णी, नात सौ. सृष्टी गोगटे आणि सौ. ज्योती दाते यांच्या नणंद श्रीमती अनुराधा पेंडसे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि पू. गजानन साठे यांच्या पत्नी सौ. मंगला गजानन साठे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), ज्येष्ठ कन्या सौ. अश्विनी देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), जावई डॉ. अजय देशपांडे, कनिष्ठ कन्या सौ. मानसी आगाशे, जावई श्री. मिलिंद आगाशे, नातू कु. तेजस आगाशे अन् नात कु. भक्ती आगाशे आणि कु. यशश्री देशपांडे हे ‘ऑनलाईन’ जोडलेले होते.

सकारात्मक आणि निरपेक्ष वृत्ती अन् भगवंताच्या अखंड अनुसंधानात असणार्‍या पुणे येथील श्रीमती उषा मधुसूदन कुलकर्णी सनातनच्या ११० व्या संतपदी विराजमान !

परात्पर गुरु डॉ. आठवले

सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दाते यांच्या विहीणबाई (सून सौ. ज्योती नरेंद्र दाते यांच्या आई) श्रीमती उषा मधुसूदन कुलकर्णी वर्ष १९९६ पासून, म्हणजे मागील २५ वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत.

पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी

पहिल्यापासूनच कुलकर्णीकाकूंचा स्वभाव अतिशय कष्टाळू आणि सहनशील असल्यामुळे त्यांनी पुष्कळ शारीरिक श्रम करून स्वतःचे प्रापंचिक दायित्व पार पाडले. परेच्छेने वागणे, इतरांचा विचार करणे आणि परिस्थिती स्वीकारणे या गुणांमुळे संसारात राहूनही त्यांची आध्यात्मिक उन्नती होत राहिली. वर्ष २०१३ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या.

कुलकर्णीकाकूंच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रसंगाकडे सकारात्मक वृत्तीने पहाणे ! कौटुंबिक स्तरावर अनेक अडचणी येऊनही सकारात्मक वृत्ती, निरपेक्षता आणि स्थिर स्वभाव अन् देवावर असलेली दृढ श्रद्धा यांमुळे त्यांनी कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड दिले. या सर्व गुणांमुळे त्यांची आंतरिक साधना होत राहिली. अंतर्मनातून चालू असलेला नामजप आणि देवाशी असलेले अखंड अनुसंधान यांमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे. आजच्या शुभ दिनी श्रीमती उषा मधुसूदन कुलकर्णी यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून त्या ‘व्यष्टी संत’ म्हणून सनातनच्या ११० व्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत.

त्यांचे जावई डॉ. नरेंद्र दाते यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के असून कन्या सौ. ज्योती दाते यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के आहे.

‘पू. (श्रीमती) उषा मधुसूदन कुलकर्णी यांची पुढील प्रगतीही जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


प्रामाणिकपणा, सेवाभावी वृत्ती आणि देवाच्या अखंड अनुसंधानात असलेले पुणे येथील श्री. गजानन बळवंत साठे सनातनच्या १११ व्या संतपदावर विराजमान !

पू. गजानन साठे

पुणे येथील श्री. गजानन बळवंत साठे (वय ७७ वर्षे) मागील १९ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्यांनी ‘स्थापत्य अभियंता’ ही पदवी संपादन करून त्यापुढील पदव्युत्तर (‘एम्.ई. सिव्हिल’चे) शिक्षणही घेतले आहे. त्यांनी ३४ वर्षे शासकीय नोकरी केली. सध्याच्या काळात शासकीय नोकरी सचोटीने करणे अत्यंत कठीण असतांना साठेकाकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आपला कार्यकाळ प्रामाणिकपणे पूर्ण केला. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. यातूनच त्यांची कर्मयोगातून साधना झाली.

वर्ष २००२ पासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतांना त्यांनी विज्ञापने आणणे, दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांचे वितरण करणे आदी सेवा आनंदाने अन् भावपूर्ण रितीने केल्या. शांत, नम्र स्वभाव आणि अल्प अहं असलेल्या साठेकाकांची या वयातही कोणतीही सेवा करण्याची सिद्धता असते.

साठेकाका स्वतःच्या प्रारब्धभोगांकडे साक्षीभावाने पहातात. मध्यंतरी झालेल्या त्यांच्या शस्त्रकर्मांच्या वेळी देवाच्या अनुसंधानात राहून शांत आणि स्थिरतेने त्यांनी आपले शारीरिक त्रास सहन केले. प्रामाणिकपणा, सेवाभावी वृत्ती आणि देवाशी अनुसंधान यांमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे. वर्ष २०१२ मध्ये त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली होती. आजच्या शुभ दिनी त्यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून ते ‘व्यष्टी संत’ म्हणून सनातनच्या १११ व्या संतपदावर विराजमान झाले आहेत.

त्यांच्या पत्नी सौ. मंगला साठे (वय ७४ वर्षे) यांची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के असून त्यांची कन्या आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. अश्विनी देशपांडे यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के आहे. अशा प्रकारे त्यांचे कुटुंबीयही साधनेत पुढे पुढे जात आहेत.

‘पू. गजानन साठे यांची पुढील प्रगतीही जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

असा झाला भावसोहळा !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याकडून श्रीफळ आणि भेटवस्तू घेतांनाची पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी (उजवीकडे) यांची भावमुद्रा

कार्यक्रमात आरंभी ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. वैभवी भोवर यांनी भावार्चना घेतली. भावार्चनेमुळे उपस्थित साधकांचा भगवान श्रीकृष्णाप्रतीचा भाव जागृत झाला. ‘भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीतच सर्व सोहळा पार पडत आहे’, असे सर्वांना जाणवत होते. त्यानंतर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी आणि पू. गजानन साठे यांच्याशी त्यांच्या साधनाप्रवासाविषयी वार्तालाप करत ते संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केले. या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी आणि पू. गजानन साठे यांना आशीर्वादरूपी संदेश पाठवला होता. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी त्या संदेशाचे वाचन केले. ही वार्ता ऐकून ऑनलाईन उपस्थित असणार्‍या सर्व साधकांना पुष्कळ आनंद झाला आणि सर्वांनी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. ‘ज्या क्षणाची वाट पहात होतो, ते झाले’, असा विचार सर्वांच्या मनात आला. आनंद वार्ता ऐकल्यावर साधकांना कृतार्थ झाल्याचे जाणवले. ‘भगवान श्रीकृष्णाने पुण्यनगरीला २ संतरत्ने देऊन कृष्णजन्मोत्सवाची भेटच दिली’, असे वाटून सर्वांचा भाव दाटून आला.


संत घोषित झाल्यानंतर संतद्वयींनी दिलेला संदेश

‘परात्पर गुरु डॉ. आठवले समवेतच असतात’, असा भाव ठेवावा ! – पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी

संत घोषित झाल्यावर मला आनंद झाला. माझी पात्रता नसतांनाही गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला ही भेट दिली. काय बोलावे, तेच कळत नाही. ‘परात्पर गुरुदेव आपल्या समवेतच आहेत’, असा भाव सर्व साधकांनी सतत ठेवावा. सर्व काही परात्पर गुरुदेव करवून घेतील. (या वेळी पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांचा भाव जागृत झाला.)

‘अहर्निशं सेवामहे ।’ या ध्येय वाक्याप्रमाणे सतत सेवारत रहा ! – पू. गजानन साठे

‘अहर्निशं सेवामहे ।’ या ध्येय वाक्याप्रमाणे परात्पर गुरुदेवांनी दिलेल्या सेवांमध्ये सतत सेवारत रहा. सतत सेवारत राहिले, तर संकटाला शांतपणे तोंड देण्यासाठी बळ मिळते. आपल्यात तळमळही निर्माण होते. त्यामुळे परिपूर्ण सेवा करता येते.

विहीणबाई आणि मी संत झाल्याने पुष्कळ आनंद झाला ! – पू. (श्रीमती) निर्मला दाते

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी

पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी या माझ्या विहीणबाई आहेत. आम्ही दोघीही संत झालो, याचा पुष्कळ आनंद होत आहे. त्यांनी अतिशय कष्टात दिवस काढले आणि प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे गेल्या. मानसिक त्रासामुळे डळमळीत न होता त्या ईश्वराच्या अनुसंधानात राहिल्या.

‘पू. साठेकाका यांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, असे वाटत होते ! – पू. (श्रीमती) निर्मला दाते

‘पू. गजानन साठेकाका यांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, असे मला पुष्कळ आधीपासून वाटत होते. त्यांची प्रगती होऊन ते संत झाले. याचा मला पुष्कळ आनंद झाला आहे. ते अतिशय प्रेमळ आहेत. त्यांच्यातील ‘प्रामाणिकपणा’ हा गुण शिकण्यासारखा आहे.

परात्पर गुरुदेवांच्या चरणी समर्पित होणारे संतद्वयी !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी आणि पू. गजानन साठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र अन् भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून नतमस्तक झाल्या.

पू. गजानन साठे यांनी ‘माझे काही नाही, सर्व काही गुरुदेवांचे आहे’, असे सांगत स्वतःला आलेली अनुभूती अतिशय उत्साहात सांगितली आणि साधक मंत्रमुग्ध झाले.

संतसन्मान सोहळ्यातील काही क्षणमोती

१. पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींनी दोघांचीही गुणवैशिष्ट्ये सांगितल्यावर साधकांना आनंद वाटून उत्साह निर्माण झाला.

२. वातावरणात पुष्कळ हलकेपणा जाणवत होता. सायंकाळची वेळ असूनही पहाट झाल्यासारखे वाटत होते.

३. सर्वांना परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सर्व साधकांना कृपाशीर्वाद देत आहेत’, असे जाणवून ‘सोहळा संपूच नये’, असे अनेकांना वाटत होते.


आध्यात्मिक प्रगती केलेले पू. कुलकर्णी यांचे नातेवाईक

आध्यात्मिक प्रगती केलेले पू. साठे यांचे नातेवाईक

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक