कामाची परवानगी (वर्कऑर्डर) मिळण्यासाठीच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी लाच घेतल्याचे प्रकरण !
भ्रष्टाचाराची कीड संपुष्टात येईल तो सुदिन ! लाचखोर अधिकारी देशाचा विकास खुंटवत आहेत, हे लक्षात घेऊन त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. – संपादक
पिंपरी (पुणे) – कामाची परवानगी (वर्कऑर्डर) मिळण्यासाठीच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी १ लाख १८ सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणाचे अन्वेषण करत असतांना स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय साहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांनी ते वर १६ जणांना द्यावे लागते, असे म्हटलेले रेकॉर्ड झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमधील १६ सदस्यांची चौकशी करण्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाम असून अटकेत असलेले ५ आरोपी आणि स्थायी समितीचे १६ सदस्य यांच्यात काही संगनमत आहे का ? याविषयी सखोल अन्वेषण बाकी असल्याचे न्यायालयात सांगितले. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या सदस्यांचा यात समावेश आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष अधिवक्ता नितीन लांडगे, त्यांचे स्वीय साहाय्यक आणि मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, पद लिपिक विजय चावरिया, संगणक ऑपरेटर आणि शिपाई यांना पोलिसांनी कह्यात घेतले असून ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.