पू. शिवाजी वटकर यांनी रुग्णाईत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले शेषशायी महाविष्णु असल्याचे अनुभवणे !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. रुग्णाईत असतांना काही सेवा करूनही शांतपणे पडून रहाणे अशक्य वाटून मन अस्थिर होणे

पू. शिवाजी वटकर

‘३०.३.२०२० या दिवसापासून मी ‘सायटिका, म्हणजे पायाची नस (नाडी) आखडणे’, या व्याधीने ग्रस्त आहे. त्यामुळे मला बसता किंवा चालता येत नाही. तेव्हा आधुनिक वैद्यांनी मला विश्रांती घेण्याविषयी समुपदेशन केले आहे. झोपल्यावर मला अल्प प्रमाणात त्रास जाणवतो. त्या वेळी मी संपर्काची सेवा, भ्रमणभाषवर व्हॉइस टायपिंग (भ्रमणभाषवर बोलून टंकलेखन करण्याची सुविधा), प्रार्थना आणि नामजप अन् गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करणे इत्यादी कृती करत आहे. झोपल्यावर माझा शारीरिक त्रास अल्प होत असला, तरी काही वेळा माझे मन अस्थिर होऊन माझ्या मनात नकारात्मक विचार येतात आणि मला शांतपणे पडून रहाणे अशक्य होते. मला दोन दिवस पलंगावर शांतपणे पडून रहाणे शक्य होत नाही; मात्र तेव्हा ‘शेषशायी भगवान श्रीविष्णु युगानुयुगे ब्रह्मांडाचा कारभार चालवतो’, याची मला जाणीव होऊन त्याच्या चरणी शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त होते.

२. एकाच ठिकाणी राहून साधना करणे, ही तपश्चर्या असल्याचे प.पू. दास महाराज यांनी सांगणे

१.३.२०२० या दिवशी मी रामनाथी आश्रमात प.पू. दास महाराज यांच्या भेटीसाठी गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘माझे गुरु प.प. श्रीधरस्वामी यांनी १४ वर्षे एका गुहेत राहून तपश्चर्या केली. त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले वर्ष २००७ पासून रामनाथी आश्रमातील एका खोलीमध्ये राहून तपश्चर्या करत आहेत. एका गुरूंनी गुहेत राहून तपस्या केली, तर दुसरे गुरु केवळ एका खोलीत वास्तव्य करून राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य करत आहेत. परात्पर गुरु डॉक्टर हे प.प. श्रीधरस्वामी यांचे रूप असून ते ‘हिंदु राष्ट्र’ निर्मितीचे कार्य करण्यासाठी कार्यरत आहेत.’’

३. एकाच खोलीत राहूनही विश्वव्यापी धर्मप्रसार आणि आदर्श अशा ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हे कार्य अव्याहतपणे चालू असणे

वर्ष १९८९ पासून जवळजवळ १० वर्षे मी परात्पर गुरु डॉक्टरांकडे सेवेनिमित्त नित्यनेमाने जात होतो. तेव्हा ते मुंबईमध्ये एका सदनिकेमध्ये रहात होते. त्याच सदनिकेत त्यांचा दवाखाना, म्हणजेच त्यांनी स्थापन केलेले सनातनचे पहिले सेवाकेंद्र होते. तेव्हा १० वर्षांच्या कालावधीत ते अध्यात्मप्रसार, सार्वजनिक (जाहीर) सभा, तसेच त्यांच्या गुरूंकडे जाणे यांसाठी घराबाहेर पडत असत. ते एखादी वस्तू विकत घेणे, फिरणे किंवा समारंभ यांसाठी ते कधीही बाहेर पडले नाहीत. सध्याही जवळजवळ १४ वर्षे ते सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील एका खोलीमध्ये वास्तव्यास आहेत. त्या ठिकाणी त्यांचे ग्रंथ लिखाण, आध्यात्मिक संशोधन, सात्त्विक कलांविषयी मार्गदर्शन आणि ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी दिशादर्शन आदी कार्य अव्याहतपणे चालू आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेणार्‍या संघटनाचे कार्य देश-विदेशात चालू आहे. ते सहस्रो साधकांकडून साधना आणि सेवा करवून घेत आहेत. साधकांची प्रगती करून घेऊन त्यांना आनंद देत आहेत. ‘विश्वव्यापी धर्मप्रसार आणि आदर्श अशा ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना, म्हणजेच धर्म संस्थापनेचे कार्य ते एका खोलीत राहून कसे काय करू शकतात ?’, याचे सर्वांना आश्चर्य वाटते. ही सर्व ‘साक्षात् श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आहे’, असे मला वाटते.

४. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना शेषशायी श्रीविष्णूच्या रूपात दर्शन देऊन उपकृत करणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अवतार आहेत’, असे महर्षींनी यापूर्वीच सांगितले आहे. पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांच्या जीवनाडीपट्टी वाचनात महर्षि मयन यांनी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना शेषशायी श्रीविष्णूच्या रूपात दर्शन द्यावे’, अशी आज्ञा केली होती. त्यानुसार आम्हा साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांनी शेषशायी श्रीविष्णूच्या रूपात दर्शन देऊन उपकृत केले.

५. सर्वसाधारण व्यक्तीला दोन दिवसही एका खोलीत रहाणे अशक्य असणे; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांना हे कार्य सहजतेने करता येणे, हेच ते श्रीमहाविष्णु असल्याचे सिद्ध होत असणे

मी रुग्णाईत असतांना किंवा इतर वेळीही माझ्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीला दोन दिवस एका खोलीमध्ये रहाणे अशक्य होते. मी रुग्णाईत असतांना एक आठवडा पलंगावर झोपून आहे. येथे मला कोंडल्यासारखे वाटते. त्यामुळे मला अधून-मधून कंटाळा येतो आणि मनात नकारात्मक विचारही येतात. तसेच परिस्थिती स्वीकारणे कठीण जाते; मात्र परात्पर गुरु डॉक्टर रामनाथी आश्रमातील एका लहानशा खोलीमध्ये राहून ब्रह्मांडाचा कारभार चालवत आहेत. ‘परात्पर गुरु डॉक्टर शेषशायी भगवान श्रीमहाविष्णुच, म्हणजेच भगवंतच आहेत.’ मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.४.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक