क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकार्‍यांना पडताळणीचे अधिकार !

७२७ खासगी रुग्णालयांवर महापालिकेचे लक्ष !

या निर्णयामुळे वैद्यकीय सुविधा सुधारल्यास जनतेला याचा लाभ होईल; मात्र वैद्यकीय सुविधा खरच सुधारल्या जातात का ?, याकडेही लक्ष द्यायला हवे. – संपादक

पुणे – महापालिकेकडे नोंदणी केलेली शहरातील ७२७ खासगी रुग्णालये, विनापरवाना कार्यरत असलेली खासगी रुग्णालये यांवर महापालिकेचे लक्ष असणार आहे. महापालिकेच्या अंतर्गत खासगी रुग्णालयांची ३ वर्षांतून एकदा पडताळणी होत होती; मात्र महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी याविषयी नुकतेच नवीन आदेश काढले आहेत. त्यांनी आरोग्य विभागाच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतील १५ क्षेत्रीय वैद्यकीय अधिकार्‍यांना पडताळणीचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे आता ही पडताळणी प्रति ६ मासांनी होणार आहे. त्यामुळे विनापरवाना रुग्णालये उभारणी, असक्षम डॉक्टर आणि साहाय्यक यांची नेमणूक, अपुर्‍या सुरक्षा सुविधा इत्यादींची माहिती उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासगी रुग्णालयांच्या मनमानीलाही याने आळा बसणार असल्याने शहरातील वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारला जाईल. राज्यशासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येकी ८ खाटांमागे १ ऑक्सिजन खाट असली पाहिजे, ३० खाटांपेक्षा अधिक क्षमतेच्या रुग्णालयात स्वतंत्र ‘ओ.पी.डी.’ आवश्यक आहे, साहाय्यक वैद्यकीय कर्मचारी वर्ग, शस्त्रकर्मगृह, अग्नीशमन उपकरणे यांची व्यवस्था हवी, तसेच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीवर्ग प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमुळे खासगी रुग्णालयांची संख्या अनुमाने ८५० होईल. त्यामुळे वैद्यकीय सुविधा त्या दर्जाच्या आढळल्या नाहीत, तर प्रतिखाट ५ सहस्र रुपये दंडात्मक कारवाई होणार आहे.