‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’च्या वतीने चालू असलेल्या अवैध मनकर्णिका कुंडाच्या उत्खनन प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार पुरातत्वाचे संकेत भंग न करता जतन आणि संवर्धन करा !

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे (उजवीकडे) यांच्याशी चर्चा करतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, २४ ऑगस्ट (वार्ता.) – मनकर्णिका कुंडाच्या उत्खनन प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार पुरातत्वाचे संकेत भंग न करता जतन आणि संवर्धन करण्यात यावे, पूर्व द्वारातून येणारे सांडपाणी ज्याचे त्यांनी स्वखर्चाने बाहेरून वळवून घ्यावे. मंदिराचे पावित्र्य आणि पुरातत्वाचे संकेत अबाधित राखावेत, या मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २४ ऑगस्ट या दिवशी जिल्हा प्रशासनास देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या नावे असलेले हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी स्वीकारले.

या वेळी शिवसेना करवीर तालुका प्रमुख श्री. राजू यादव, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदु समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर अस्वले, शिवसेना कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू सांगावकर, श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे सदस्य श्री. प्रमोद सावंत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. बाबासाहेब भोपळे, श्री. बाळासाहेब नलवडे उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरातील मनकर्णिका कुंड १५ मार्च २०१३ या दिवशी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी खुले करण्याचे आदेश दिले होते. पूर्वी हे कुंड नगरपालिकेच्या कह्यात देऊन भराव टाकून बुजवण्यात आले होते. त्यानंतर महापालिका अस्तित्वात आल्यावर या कुंडावर बगीचा करण्यात आला. कालांतराने एका बाजूला सुलभ शौचालय बांधून ठेकेदाराच्या वतीने महापालिकेने उत्पन्नाचे साधन बनवले. जागा देवस्थानची, उत्पन्न महापालिकेला आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती निष्क्रीय अशी विचित्र स्थिती होती.

२. एका शक्तीपिठाच्या स्थानी धार्मिक महत्त्व असलेल्या मनकर्णिका कुंडावर शौचालय बांधून त्याचे पावित्र्य भंग करण्यात आले. या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष यांनी आवाज उठवल्यावर गेल्या वर्षापासून हे कुंड खुले करण्याचे काम चालू झाले.

३. हे कुंड खुले करतांना कोणतीही पूर्वसिद्धता न करता काम चालू केल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या कुंडावर शौचालय बांधून महापालिकेने त्यावर उत्पन्न मिळवले असल्याने ती पूर्वस्थितीत मोकळी करून देणे हे महानगरपालिकेचे नैतिक दायित्व आहे. त्यामुळे ही जागा देवस्थान समितीने कह्यात घेऊन देवीच्या उत्पन्नातील निधी त्यासाठी व्यय करणे हे अवैध आणि अधिकारांचा गैरवापर करणारे आहे, याची गंभीर नोंद घेण्यात यावी.

४. मनकर्णिका कुंडावर अतिक्रमण करणार्‍यांनी ते विनातक्रार, विनामोबदला काढून घेण्याचे मान्य केले आहे; मग महापालिका आणि देवस्थान समिती यांनी अगोदरच हे का केले नाही ? विनामोबदला अतिक्रमण काढून घेणे म्हणजे करणार्‍याला यापूर्वी मोबदला पाहिजे होता, असे समजायचे का ? अथवा यापूर्वी अतिक्रमणाचा मोबदला कुणाला दिला जात होता का ? हे प्रश्न अनुत्तरितच रहातात. पुरातत्व विभागाकडून जुन्या नकाशाच्या आधारे मनकर्णिका कुंडाचे क्षेत्र निश्चित करावे.

५. मंदिराचे पूर्व द्वार आणि त्याखालून सांडपाणी आत येते आणि हे सांडपाणी थेट मनकर्णिका कुंडात मिसळते. वास्तविक १० वर्षांपूर्वी मंदिरातील फरशी काम करतांना हे सांडपाणी बाहेरून वळवून घेण्याची हमी तत्कालीन नगरसेवक आणि महापालिका यांनी दिली होती. प्रारंभी १५ ते २० दिवस तसे झाले; मात्र परत हे पाणी कुंडात मिसळण्यास प्रारंभ झाला. पुराण वास्तूशास्त्रानुसार हे एक संरक्षित स्मारक घोषित केले आहे आणि त्याचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. त्यामुळे कुंडाच्या रचनेत फेरफार करणे, विद्रूपीकरण करणे, धार्मिक भावना दुखावणे, या तरतुदींआधारे संबंधित लोकांवर कारवाई करण्यात यावी. श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे सदस्य श्री. प्रमोद सावंत यांनी मार्चमध्ये जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊनही त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.