हे मना, हो शरणागत आणि लीन श्री गुरुचरणी ।

‘दळणवळण बंदीचा काळ असतांना एकदा ‘मी साधनेत अल्प पडतो. देव माझ्यासाठी किती करत आहे, तरी मी देवाला अपेक्षित असे करायला न्यून पडतो’, या विचाराने माझे मन थोडे निराश झाले होते. त्या वेळी अकस्मात् माझ्या मनातील विचार बाजूला सरले आणि पुढील काव्यपंक्ती स्फुरल्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले
होमिओपॅथी वैद्य अंजेश कणगलेकर

का रे मना, होतोस तू अस्थिर ।
दमतोस का रे, तू फिरून भिरभिर ।। १ ।।

हो शरणागत आणि लीन श्री गुरुचरणी ।
करतील ते तुला स्थिर स्वस्वरूपी ।। २ ।।

काय सांगू तुला गुरुदेवांची महती ।
अंतरंगी भक्तीरूपे जे वसती ।। ३ ।।

करूनी शरणागत तुला स्वचरणी ।
मुक्त करून जे पूर्णत्वाकडे नेती ।। ४ ।।

का रे मना, होतोस तू अस्थिर ।
हो शरणागत आणि लीन श्री गुरुचरणी ।। ५ ।।

आपल्या गुरुदेवांनी या अंतरंगी जाणिवेचे बीज रोवले आहे. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच पडेल. ‘देवाला शरणागत भक्त प्रिय असतो’, असे म्हणतात, तरी ‘या दिनाला तुम्हीच शरणागत ठेवावे’, अशी मी प्रार्थना करतो.

नंतर ‘देव किती काळजी घेतो ना !’, असे परात्पर गुरुदेवांचे शब्द माझ्या कानावर पडले आणि माझे मन कृतज्ञतेने भरून आले.

या सूत्रांचे टंकलेखन करतांना मला दैवी सुगंध येत होता आणि अधून मधून माझ्या शरिरावर रोमांच येत होते.’

– होमिओपॅथी वैद्य अंजेश कणगलेकर, बेळगाव (१२.७.२०२०)

वरील कवितेतील ओळी वाचल्यावर मन स्थिर होऊन आनंदाने सेवा करणे

‘मी सेवेला आरंभ करण्याआधी माझे मन भूतकाळात रमले होते. मी होमिओपॅथी वैद्य अंजेश कणगलेकर यांनी लिहिलेल्या ‘का रे मना, होतोस तू अस्थिर’ या काव्यपंक्ती संकलन करतांना वाचल्या आणि माझे मन स्थिर झाले. नंतर मी आनंद घेत सेवा करू लागले. त्या वेळी ‘देवाला माझी किती काळजी आहे’, असे विचार मनात येऊन माझी भावजागृती झाली आणि गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्रीमती शर्मिला पळणीटकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१२.२०२०)