भारतमाता की जय संघाच्या वतीने उद्या पणजी येथे ‘हिंदु रक्षा अधिवेशन’

पणजी(प्रसिद्धीपत्रक)– भारतमाता की जय संघाच्या वतीने रविवार, २२ ऑगस्ट २०२१ या दिवशी ‘हिंदु रक्षा अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. गोमंतक मराठा समाज सभागृह, पणजी येथे हे अधिवेशन होईल.

कोरोनाविषयक शासकीय निर्बंधांमुळे केवळ संपूर्ण गोवा आणि दोडामार्ग तालुक्यातून निमंत्रित निवडक प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३०, या कालावधीत होणार्‍या या विशेष अधिवेशनात गोवा सुरक्षा मंच आणि भारतमाता की जय संघाची पुढील वाटचाल अन्  संकल्प यांविषयी महत्त्वाचे दूरगामी निर्णय घेण्यात येणार आहेत.

गोव्यात एकंदर राजकीय स्वार्थ लोलुपतेमुळे संकटात येऊ घातलेल्या हिंदु समाजासमोरील आव्हाने आणि त्या अनुषंगाने करावयाचे  परिणामकारक दूरगामी उपाय, अशा गोष्टींवर उहापोह होऊन या ‘हिंदु रक्षा अधिवेशना’त महत्त्वाचे ठराव पारित करण्यात येणार आहेत. येत्या ४ वर्षांत साकार करावयाचे संकल्प या वेळी घोषित करण्यात येतील.

भारतमाता की जय संघाचे तालुका स्तरापासून वरचे, तसेच परिवार संघटनातील पदाधिकारी, संलग्न मातृशक्तीच्या प्रतिनिधी आणि अन्य  निमंत्रित, असे कार्यकर्ते ‘हिंदु रक्षा अधिवेशना’त सहभागी होणार आहेत.