ज्ञानवापी मशिदीमध्ये पूजा करण्याची अनुमती मिळावी ! – ५ महिलांकडून दिवाणी न्यायालयात याचिका

न्यायालयाकडून उत्तरप्रदेश सरकार, मशीद समिती आणि काशी विश्‍वानाथ मंदिर ट्रस्ट यांना उत्तर देण्यासाठी नोटीस

हिंदूंच्या ५ महिला अशा प्रकारची मागणी करण्याचे धाडस दाखवतात, हे अभिमानास्पद आहे. भारतातील जन्महिंदूंनी यातून बोध घ्यावा ! – संपादक

ज्ञानवापी मशिद

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील काशी विश्‍वनाथ मंदिरासमोरील ज्ञानवापी मशिदीमध्ये श्री श्रृंगार गौरीदेवी, श्री गणेश आणि श्री हनुमान यांच्या मूर्ती ठेवून पूजा करण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी येथील ५ महिलांनी दिवाणी न्यायालयामध्ये केली आहे. या याचिकेवरून न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकार, ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समिती आणि काशी विश्‍वनाथ मंदिर ट्रस्ट यांच्याकडून उत्तर मागितले आहे. १० सप्टेंबरला यावर पुढील सुनावणी करण्यात येणार आहे.

१. या महिलांनी अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि अधिवक्ता विष्णुशंकर जैन यांच्या माध्यमांतून प्रविष्ट केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, औरंगजेबाच्या काळात काशी विश्‍वनाथ मंदिराची तोडफोड करून तेथे मशीद बांधण्यात आले. वास्तविक हे हिंदूंचे प्राचीन मंदिर आहे. त्यामुळे येथे हिंदु भाविकांना दृष्य आणि अदृष्य देवतांची पूजा करण्याचा अधिकार आहे.

२. ‘विश्‍व वैदिक सनातन संघा’चे प्रमुख जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, सनातन धर्मावरील लागलेले असे कलंक हटवण्यासाठी अभियान राबवले जाणार आहे. त्यानुसार याचिका प्रविष्ट केल्या जाणार आहेत. आगरा येथील ताजमहालच्या मुक्तीसाठीही याचिका प्रविष्ट करण्यात येणार आहे.