उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. लक्ष्मी पुंड ही आहे !
(२०१८ मध्ये कु. लक्ष्मी पुंड हिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के होती. – संकलक)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. प्रेमभाव आणि इतरांचा विचार करणे
‘तीव्र आध्यात्मिक त्रासांमुळे मी सतत रुग्णाईत असते. अनेकदा लक्ष्मी यासाठी ‘काय केल्याने माझी मावशी बरी होईल ?’, असे नामजपादी उपाय श्रीकृष्णाला विचारते. असेच प्रयत्न ती मामा (श्री. आनंद डाऊ) आणि आजीसाठीही (श्रीमती सुलभा डाऊ यांच्यासाठीही) करते.
२. शिकण्याची वृत्ती
लक्ष्मी ‘चहा करणे, कूकर लावणे, देवघराची भांडी घासणे’, या गोष्टी लहान वयातच शिकून ती या कृती प्रतिदिन करते.’
– सौ. अनुभूती टवलारे (लक्ष्मीची मावशी)
३. धर्माविषयी जागरूक असणे
‘दळणवळण बंदीच्या आधी शाळा चालू असतांना लक्ष्मीच्या मामाने तिला ‘हलाल सर्टिफिकेट’विषयी एकदाच माहिती सांगितली होती. त्यानंतर ‘हलाल सर्टिफिकेट’ असलेला एक चॉकलेटचा कागद तिने जपून ठेवला आणि शाळेच्या गाडीतून जातांना तिने शाळेतील मुलांचे त्याविषयी प्रबोधन केले. त्याचा तिला सकारात्मक प्रतिसादही मिळाला.
४. ‘स्वतःचा अहं वाढेल’, याची जाणीव ठेवणे
‘४.८.२०२० या दिवशी ऑनलाईन बालसंस्कार वर्गामध्ये तिचे चित्रीकरण करून पाठवायचे’, असे आमचे ठरले होते; परंतु अकस्मात् लक्ष्मी त्यासाठी ‘नाही’ म्हणाली. त्याचे कारण विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘परात्पर गुरुदेव मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘जर मी चित्रीकरण करून पाठवले, तर सगळे माझे कौतुक करतील आणि माझा अहं वाढेल.’ तसेच मला दृष्टही लागेल.’’ तेव्हापासून तिने पुन्हा चित्रीकरण करण्याविषयी चर्चा केली नाही.
५. मानसपूजा करतांना गुरुदेवांच्या अनुसंधानात राहून श्रीकृष्णभेटीचा आनंद अनुभवणे
एकदा लक्ष्मीने पुढीलप्रमाणे मानसपूजा केली. ‘एका रात्री मी रामनाथी आश्रमात गेले. त्या वेळी सर्व साधक आणि गुरुमाऊली झोपले होते. सकाळी उठल्यावर मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीची स्वच्छता केली आणि नंतर त्यांना उठवले. मोठ्या घंगाळामध्ये त्यांना बसवून त्यांना स्नान घातले. त्यानंतर मी त्यांना स्वतः शिवलेले कपडे घालण्यास दिले आणि त्यांच्या गळ्यात सुवासिक फुलांचा हार घातला. त्या वेळी ते म्हणाले, ‘तुला कृष्णाला भेटायचे आहे का ?’ मी ‘हो’ म्हटल्यावर ते मला कृष्णाकडे घेऊन गेले. तेथे आधीपासूनच माझी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची मावस बहीण कु. गिरिजा टवलारे होती. श्रीकृष्णाचे रूप पुष्कळ मोठे होते. त्यामुळे आम्ही चरण धरायला गेल्यावर केवळ चरणांची करंगळीच धरली गेली. करंगळी इतकी मुलायम होती की, आम्ही दोघीही तिच्यावरून सतत घसरत होतो; म्हणून श्रीकृष्णाने आम्हाला चिकटपट्टीने चरणांशी बांधून ठेवले. श्रीकृष्णाने त्याच्या चिमटीत मावेल, इतका खाऊ आम्हाला दिला. त्याच्या चरण धुण्याच्या पाण्यामध्ये आम्ही पोहत होतो आणि पुन्हा त्या करंगळीला चिकटायचो.’
– सौ. सविता पुंड (आई)
६. परात्पर गुरु डॉक्टरांवरील दृढ श्रद्धा
‘घरात वडिलांचा तीव्र विरोध असूनही लहानपणापासूनच ‘गुरुदेव सर्वकाही सांभाळतील आणि गुरुदेवच वडिलांना एक दिवस आश्रमात नेतील’, अशी तिची ठाम श्रद्धा आहे. तिच्या या श्रद्धेमुळेच घरातील वाद न्यून झाले आहेत. तिचे वडील आजीला भेटण्याच्या निमित्ताने एकदा अमरावती सेवाकेंद्रात येऊन गेले आहेत. त्यानंतर त्यांच्यात पालट जाणवतो. पूर्वी सनातननिर्मित सात्त्विक उत्पादने लपून वापरावी लागत. आता त्यांच्यासमोर उघडपणे नामजपादी उपाय करता येतात. तिची आई दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करते. लक्ष्मी, तिचा मोठा भाऊ आणि आई प्रतिदिन सांगितलेले नामजप, मंत्र आदी उपाय नियमित करतात. ‘हे सर्व पालट लक्ष्मीच्याच तळमळीमुळे देव त्यांना अनुभवण्यास देत आहे’, असे जाणवते.’
– सौ. अनुभूती टवलारे
७. आपत्काळाची सिद्धता करणे
७ अ. स्वप्नात आपत्कालीन दृश्य दिसणे आणि ‘ते दृश्य म्हणजे गुरुदेवांची आज्ञाच आहे’, असा भाव ठेवून आपत्काळाची सिद्धता करणे : ‘१०.७.२०२० या दिवशी लक्ष्मीला स्वप्न पडले. त्यामध्ये ‘लक्ष्मी आगाशीत उभी असतांना आमच्या इमारतीच्या समोरील इमारतीला आग लागल्याचे तिला दिसले. स्वप्नातच लक्ष्मी स्वतःच्या घरात गेली. तेव्हा आग लागल्याचे कुणालाच ठाऊक नव्हते आणि घरात प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉक्टर आले होते. ते लक्ष्मीला म्हणाले, ‘लक्ष्मी लवकर तुझी बॅग भर. आता या ठिकाणी भूकंप होणार आहे.’ त्यानंतर घरातील सर्वांना सांगून तिने बॅगमध्ये आवश्यक ते साहित्य भरले. परात्पर गुरु डॉक्टरांनी लक्ष्मीचा आणि तिच्या वडिलांचा हात धरला अन् घरातील सर्व सदस्य इमारतीच्या खाली उतरले.’ लक्ष्मी उठल्यावर तिने हे स्वप्न मला सांगितले आणि ‘ते स्वप्न म्हणजे गुरुदेवांची आज्ञा आहे’, असा भाव ठेवून तिने प्रत्यक्षात एक बॅग घरात भरून ठेवली आहे. त्यामध्ये ‘सर्वांचे थोडे कपडे, उपायांचे सर्व साहित्य, परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःच्या हस्ताक्षरात काही वर्षांपूर्वी तिच्या पत्राला उत्तर दिले होते, ते पत्र’, असे साहित्य तिने भरले आहे.
७ आ. आपत्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याप्रमाणे कृती करणे : लक्ष्मीची बर्याच दिवसांपासून सायकल घेण्याची इच्छा होती. आर्थिक अडचणीमुळे आम्ही ती घेऊ शकत नव्हतो. माझ्याकडे काही पैसे जमा झाल्यावर मी तिला सायकल घेण्याविषयी विचारले. त्या वेळी ती म्हणाली, ‘‘आई, माझी आता सायकल घेण्याची इच्छाच नाही. आपत्काळ आला असल्याने ‘असा व्यय न करता ते पैसे आपत्काळासाठी जमा करूया’, असे विचार माझ्या मनात येतात.’’ ते पैसे तिने भरून ठेवलेल्या आपत्कालीन बॅगमध्ये ठेवून दिले. यावरून ‘तिने आपत्काळाचे गांभीर्य जाणले आहे’, हे लक्षात येते.
८. अलीकडे जाणवलेले पालट
८ अ. भावाच्या स्थितीत वाढ होणे : लक्ष्मीची या काही मासांत भावाची स्थिती पुष्कळ वाढली आहे. ती अनेकदा आम्हाला सांगते, ‘आपण लहान गोष्टींचा त्याग केला, तर गुरुदेव आपल्याला मोठ्या गोष्टीची प्राप्ती करून देतात.’ लक्ष्मी म्हणते, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर नेहमीच तिला सूक्ष्मातून सांगतात, ‘आता तू माझ्याजवळ येण्याचा क्षण जवळ आला आहे आणि दूरचित्रवाणी अन् भ्रमणभाष आवश्यक तेवढेच बघत जा.’’ तेव्हापासून तिने भ्रमणभाषमधून सर्व खेळ काढून टाकले आहेत.’
८ आ. व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमध्ये वाढ होणे : ती स्वतःच्या स्वभावदोषांचे निरीक्षण आणि चिंतन करते. स्वभावदोष घालवण्याचे ध्येय घेऊन त्याप्रमाणे प्रयत्न करते. जिल्ह्यात बालसाधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा असतो, त्यामध्ये लक्ष्मी नियमित आढावा देते. तेव्हापासून तिच्या प्रयत्नांमध्ये विशेष वाढ झाली आहे.
९. स्वभावदोष
इतरांनी चुका सांगितल्यावर चिडचिड करणे, मनाविरुद्ध झाल्यावर रडणे’
– सौ. सविता पुंड (लक्ष्मीची आई), अमरावती (५.९.२०२०)