शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीकडून सन्मान !

शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना पुष्पहार घालून सन्मान करतांना श्री. कृष्णाजी पाटील !

पुणे, १८ ऑगस्ट (वार्ता.) – अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला वंदनीय असे ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व असणारे ज्येष्ठ इतिहाससंशोधक, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतेच वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री कृष्णाजी पाटील आणि पराग गोखले यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले. या वेळी श्री. पाटील यांनी  श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना पुष्पहार घातला, तसेच सनातनचा ग्रंथ आणि श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. सन्मानाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याच्या गौरवार्थ लिहिलेले सन्मानपत्रही त्यांना देण्यात आले.

शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन सन्मान करतांना श्री. कृष्णाजी पाटील

क्षणचित्रे

१. श्री. कृष्णाजी पाटील यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी तुम्हाला नमस्कार कळवला आहे’, असे सांगितल्यानंतर बाबासाहेब यांनी त्यांना देण्यात आलेली भेटवस्तू आणि श्रीफळ कपाळाला लावून भावपूर्ण नमस्कार केला.

२. श्री. बाबासाहेबांना सनातनचे ग्रंथ भेट दिल्यानंतर त्यांचे कुटुंबीय म्हणाले, ‘‘तुम्ही त्यांना जे आवडते, तेच आणले आहे. आज संध्याकाळपर्यंतच त्यांचे ग्रंथ वाचूनही होतील.’’

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेले सन्मानपत्र

समितीच्या कार्यकर्त्यांनी मला कधीही भेटायला यावे ! – बाबासाहेब पुरंदरे

या वेळी बाबासाहेब समितीच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘‘पक्वान्न खाऊनही मला जेवढा आनंद मिळणार नाही, त्याहून अधिक आनंद तुम्हाला भेटून झाला. ईश्वराकडून मला ऋणानुबंध आणि प्रेम मिळाले. ते हृदयापर्यंत पोचले आणि हे प्रेम यापुढेही असेच राहील. तुम्ही कधीही मला भेटायला या, पुन:पुन्हा या !’’