सेवेची ओढ असलेली आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. इंद्राणी सुधीर तावरे (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. इंद्राणी सुधीर तावरे ही आहे !

श्रावण शुक्ल पक्ष एकादशी (१८.८.२०२१) या दिवशी पुणे येथील कु. इंद्राणी सुधीर तावरे हिचा सहावा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. इंद्राणी सुधीर तावरे हिला सहाव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. सेवेची आणि साधनेची ओढ

सौ. राधिका तावरे

‘वर्ष २०१८ मधील दिवाळीत आम्ही कुटुंबीय देवद आश्रमात गेलो होतो. तेव्हा इंद्राणी केवळ सव्वातीन वर्षांची होती. तरी ती तेथे जपमाळ बनवण्याची सेवा अतिशय एकाग्रतेने करत होती. सेवा करतांना जेव्हा प्रार्थनेची उद्घोषणा व्हायची, तेव्हा ती लगेच हातातील सेवा बाजूला ठेवून प्रार्थना करायची. आम्ही आश्रमात जाऊन आल्यापासून तिचा हट्टीपणा पुष्कळ न्यून झाला आहे.

२. चूक झाल्यानंतर क्षमा मागणे

इंद्राणी तिच्याकडून झालेल्या प्रत्येक चुकीसाठी क्षमा मागते. एकदा मी तिला छोटे ‘स्टूल’ आणून द्यायला सांगितले; पण खेळायच्या नादात ती विसरली. मी तिला पुन्हा आठवण केल्यावर तिने माझी क्षमा मागितली आणि लगेच ‘स्टूल’ आणून दिले. तेव्हा मी तिला विचारले, ‘‘तुला चूक झाल्यावर क्षमा मागायची’, हे कुणी शिकवले ?’’ ती लगेच म्हणाली, ‘‘परम पूज्यांनी (परात्पर गरु डॉ. आठवले यांनी). ते म्हणतात, ‘कोणतीही चूक झाल्यावर क्षमा मागायची आणि ‘माझे चुकले’, असे म्हणायचे.’’

३. रामनाथी आश्रमात रहाण्याची मिळालेली संधी

३ अ. आश्रमात सहजतेने वावरणे : वर्ष २०१९ मधील मे मासात मी आणि इंद्राणी रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेव्हा रामनाथी आश्रम परिचयाचा असल्याप्रमाणे इंद्राणी पुष्कळ सहजतेने वावरत होती. तिने मला तेथे सेवा करतांना कुठलाही त्रास दिला नाही. त्यामुळे मला आश्रमात अधिक दिवस राहून सेवा करण्याची संधी मिळाली. एरव्ही ती उशिरा उठते; परंतु आश्रमात असतांना ती सकाळी ६ वाजता माझ्या समवेतच उठून सिद्ध होत असे. ‘कपड्यांच्या घड्या घालून ठेवणे आणि अत्तर अन् कापूर लावणे’, या कृती ती नियमितपणे करू लागली आहे.’

३ आ.आश्रमात इंद्राणीला बासरीचा आवाज ऐकू येणे : एके दिवशी सकाळी इंद्राणीने मला विचारले, ‘‘आई, मला फार छान आवाज ऐकू येत आहे. तुलाही येत आहे का ?’’ त्या वेळी मला कुठलाही वेगळा आवाज ऐकू येत नव्हता; म्हणून मी तिला विचारले, ‘‘तुला कसला आवाज येत आहे ?’’ ती म्हणाली, ‘‘अगं आई, श्रीकृष्ण किती छान बासरी वाजवत आहे.’’

‘हे श्रीकृष्णा, तू आम्हाला आश्रमात सेवेची संधी दिलीस आणि आश्रमातील चैतन्याचा लाभ करून दिलास, त्यासाठी आम्ही तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

एकदा माझ्या मोठ्या मुलाने माझ्या पर्समधील ३ चॉकलेट्सपैकी २ चॉकलेट्स इंद्राणीला दिली आणि एक स्वतः घेतले; परंतु त्याने घेतलेले चॉकलेटही इंद्राणीने हट्ट करून स्वतःसाठी मागून घेतले. तेव्हा मी तिला म्हणाले, ‘‘तू आता जे चुकीचे वागलीस, ते परात्पर गुरु डॉक्टरांनी पाहिले आहे आणि त्यांना ते जराही आवडले नाही. त्यामुळे आता ते तुझ्याशी बोलणार नाहीत.’’ त्या वेळी इंद्राणीने लगेच ते चॉकलेट तिच्या दादाला दिले. यावरून तिचा प.पू. गुरुदेवांप्रती असलेला भाव पहायला मिळाला. ‘परात्पर गुरु डॉक्टर आपल्याशी बोलणार नाहीत’, या विचारानेसुद्धा तिला खंत वाटली आणि त्याच क्षणी तिने स्वतःहून मोठ्या भावाला चॉकलेट देऊन त्याची क्षमा मागितली.

५. स्वभावदोष

हट्टीपणा, मोठ्याने बोलणे आणि स्वतःच्या मतावर ठाम असणे.’

– सौ. राधिका तावरे (आई), कोथरूड, पुणे. (२१.४.२०२०)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.