(म्हणे) ‘तालिबानने आम्हाला शांतता आणि सुरक्षितता यांची हमी दिली !’ – शीख समुदाय

अफगाणिस्तानातील शीख समाजाच्या प्रतिनिधींची तालिबानशी चर्चा

तालिबानसाठी शीख हे ‘काफीर’ आहेत. त्यामुळे त्याच्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवणे हा आत्मघात होय ! – संपादक

तालिबान सोबत चर्चा करताना शीख

काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानमधील शीख समाजाच्या प्रतिनिधिंनी तालिबानच्या प्रतिनिधींची भेट घेतली. या बैठकीनंतर  ‘तालिबानने आम्हाला शांतता आणि सुरक्षितता यांची हमी दिली आहे. ‘तुम्हाला देश सोडून जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही शांततेत येथे राहू शकता’, असे तालिबानने म्हटल्याचे शीख समुदायाच्या प्रतिनिधींनी सांगितले. ‘तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवण्यास आरंभ केल्यापासून २८० शीख आणि ३० ते ४० हिंदू यांनी कारती परवान गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला आहे’, असे अफगाणिस्तानमधील शिखांचे नेते गुरनाम सिंह यांनी सांगितले.

गुरनाम सिंह यांनी सांगितले की, आमच्या धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप न करण्याचेही तालिबानने आश्‍वासन दिले. कुठलीही समस्या आली, तरी संपर्क साधण्यासाठी त्यांनी दूरभाष क्रमांकही दिले आहेत.