पणजी, १६ ऑगस्ट (वार्ता.) – सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करण्यासाठी उपजिल्हाधिकारी संबंधित तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांकडून सूचना मागवत आहेत. या सूचनांवरून शासन गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करणार आहे. १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे.
याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘कोरोना महामारी अजूनही संपलेली नाही. उत्सवाच्या काळात शासन घालून देणार असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. उत्सवात कुणीही गर्दी करू नये. तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना संपर्क साधून त्यांच्याकडून सूचना घेऊन यासंबंधीचा एक संपूर्ण अहवाल शासनाला सुपुर्द करण्यास मी उपजिल्हाधिकार्यांना सांगितले आहे. नागरिकांना विश्वासात घेऊनच गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध केली जाणार आहेत.’’
प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत शासकीय अधिकार्यांच्या मडगाव आणि वास्को येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसमवेत बैठका झालेल्या आहेत. वास्को येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशचतुर्थी २ दिवस साजरी करण्याचा, तसेच प्रत्येक मंडळाला विसर्जनासाठी निरनिराळ्या वेळा निश्चित करण्याचे ठरवले आहे. मडगाव येथे झालेल्या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासंबंधीचा संदेश सर्वांपर्यंत पोचवण्याचा निर्णय झालेला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे.