दोडामार्ग, गोवा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाचा स्तुत्य उपक्रम !
पर्ये, १५ ऑगस्ट (वार्ता.) – दोडामार्ग, गोवा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी पुढाकार घेऊन राष्ट्रध्वजातील ३ रंगांची मुखपट्टी (मास्क) न वापरण्याविषयी पोलिसांना निवेदन देणे, ठिकाठिकाणी जागृतीपर पत्रकांचे वाटप करणे आदी माध्यमांतून जनजागृती मोहीम राबवली.
मोहिमेचा उद्देश स्पष्ट करतांना पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाच्या रंगांच्या मास्कची विक्री केली जात आहे; मात्र हा प्रकार चुकीचा आहे. अशी मुखपट्टी परिधान केल्यास आपली थुंकी, शेंबूड मुखपट्टीला लागून तिरंग्याचा अवमान होऊ शकतो. यामुळे राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘राष्ट्रध्वजातील ३ रंगांची मुखपट्टी’ हे देशप्रेम प्रदर्शित करण्याचे माध्यम होऊ शकत नाही, तर ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अशा प्रकारे उपयोग करणे, हा ध्वजाचा अवमानच होय. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यत कुणीही अशा तर्हेच्या मुखपट्टीचा वापर करू नये. याविषयी जागृती करण्यासाठी संघ ही मोहीम राबवत आहे.’’
या मोहिमेच्या अंतर्गत पालक-शिक्षक संघाने दोडामार्ग पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक मारिया पिंटो आणि हवालदार शुभम् गावस यांना निवेदन सुपुर्द केले, तसेच लांटबार्से पंचायत क्षेत्रात विविध ठिकाणी पत्रकांचे वाटप केले. दोडामार्ग पोलीस चौकीत निवेदन देतांना पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षा प्रणया गावस, इतर पालक दीक्षा गावस, पार्वती गावकर, दामिनी गावस, दीपिका गावस, विनंती गावस, मयुरी गावस आणि शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी गावडे यांची उपस्थिती होती.