१ सप्टेंबरपासून गोव्यातील प्रत्येक घराला प्रतिमास १६ सहस्र लिटर पिण्याचे पाणी विनामूल्य पुरवणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात घोषणा !

पणजी, १५ ऑगस्ट (वार्ता.) – १ सप्टेंबरपासून गोव्यातील प्रत्येक घराला प्रतिमास १६ सहस्र लिटर पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध करणार असल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथील ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात बोलतांना केली. त्यांनी सांगितलेली इतर सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

१. गोवा शासन सर्व गोमंतकियांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी कटीबद्ध आहे.

२. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे उद्घाटन १५ ऑगस्ट २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.

३. राज्यातील ९० टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा (डोस) देणारे गोवा राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यातील उर्वरित लोकांनाही लवकरच कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा (डोस) दिली जाणार आहे.

४. गोवा शासनाने कोरोना महामारीच्या काळातही शासनाच्या सर्व समाजकल्याण योजना चालू ठेवल्या.

५. कर्नाटक शासनाशी चालू असलेल्या म्हादई पाणीतंटा प्रकरणी गोवा शासन कदापि माघार घेणार नाही.

६. भाजपचे शासन वर्ष २०१२ पासून नवनवीन पायाभूत सुविधा उपलब्ध करत आहे, तसेच सामाजिक कल्याण योजना राबवत आहे. मानवी विकास हा भाजप शासनाचा केंद्रबिंदू आहे.

७. शासनाने १२ सहस्र शेतकर्‍यांचा सहभाग असलेले ५०० सेंद्रिय गट (‘ऑरगॅनिक क्लस्टर’) सिद्ध केले आहेत. ‘डिजिटलायझेशन’च्या माध्यमातून शेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ‘ई-कृषी’ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वर्ष २०२१ मध्ये ६ सहस्र ५७१ शेतकर्‍यांना ३३ कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे.

८. गोवा शासन आजपासून ‘स्वच्छ भारत मिशन ग्रामीण’ योजना कार्यान्वित करणार आहे.

९. राज्यातील खाण पट्टीतील लोकांना दिलासा मिळण्यासाठी गोवा शासन राज्यातील खाण व्यवसाय चालू करण्याविषयी गंभीर आहे.’’

विनामूल्य पाणीपुरवठा करण्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या घोषणेचे सर्व राजकीय पक्षांकडून स्वागत

प्रत्येक घराला प्रतिमास १६ सहस्र लिटर पिण्याचे पाणी विनामूल्य पुरवण्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या घोषणेचे सर्व राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले,‘‘गोवा शासन जनतेच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे.’’

‘मगोप’चे आमदार श्री. सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘‘विनामूल्य पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मी स्व. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्रीपदी असतांना मांडला होता आणि काही तांत्रिक कारणामुळे हा प्रस्ताव त्याकाळी स्थगित ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मार्गी लावला आहे आणि यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.’’

‘आप’चे राज्य समन्वयक राहुल म्हांबरे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘देहली मॉडेल’ गोव्यात राबवू इच्छित आहेत.’’