नोंद
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे असणार्या ‘एच्.पी. (हेवलेट पॅकार्ड) इंडिया गेमिंग लॅन्डस्केप’ या आस्थापनाने राज्यातील प्रमुख शहरांत संगणकीय खेळ (कॉम्प्युटर गेम) खेळण्याच्या संदर्भात सर्वेक्षण केले आहे. यामध्ये ‘पुरुषांच्या तुलनेत महिलांना संगणकावर खेळ खेळण्याची आणि त्यातच भवितव्य (करिअर) करण्याची आवड अधिक आहे’, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘ऑनलाईन’ खेळ खेळण्यात लक्षणीय वाढ झाली आहे, तसेच कोरोना महामारीचा एक परिणाम म्हणून मुलांचे शिक्षण ‘ऑनलाईन’ झाले. त्यामुळे त्यांच्याकडे इंटरनेट असलेले भ्रमणभाष संच आले. त्याचा एक दुष्परिणाम म्हणजे शाळेच्या वेळेव्यतिरिक्त ते ‘ऑनलाईन’ खेळ खेळू लागले. बाहेर कुठे जायचे नाही, तर घरी बसून वेळ घालवण्यासाठी मोठी माणसेही ‘ऑनलाईन’ खेळांचा पर्याय वापरू लागली. एकूणच काय तर ‘ऑनलाईन’ खेळ खेळण्याकडे सर्वांचाच कल वाढत आहे.
‘ऑनलाईन’ खेळ खेळल्यामुळे होणार्या दुष्परिणामांचा विचार केल्यास या खेळांपासून दूर रहाणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. सर्वसामान्यांसाठी ‘ऑनलाईन गेम’ म्हणजे निव्वळ करमणूक किंवा विरंगुळा असतो; पण आस्थापने यातून अब्जावधी रुपये मिळवत आहेत. मोबाईल गेमवर होणारी उलाढाल सहस्रो कोटी रुपयांमध्ये आहे. यातील काही ॲप चीनचे आहेत. त्यामुळे चीनला अब्जावधी रुपये एका दिवसात मिळतात. यातून आपण खेळाची हौस भागवता भागवता नकळतपणे शत्रूराष्ट्राला आर्थिक लाभ मिळवून देत आहोत, याचे भान नसणे, हे दुर्दैवी आहे. यासाठी प्रशासनाकडूनही काही प्रयत्न होतांना दिसत नाहीत. याचसमवेत शरीर आणि मन यांवर होणारे दुष्परिणाम वेगळेच. एकूणच काय, तर स्वतःच्या पैशाचा अपव्यय, शत्रूराष्ट्राला साहाय्य, भगवंताने दिलेल्या सुंदर शरिराची हेळसांड करणे, तसेच ‘एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही’, असे महत्त्व असणार्या वेळेचा दुरुपयोग करणे, अशा प्रकारच्या अनेक चुकीच्या गोष्टी आपल्याकडून होत आहेत. हाच वेळ, पैसा आणि मनुष्यबळ देश अन् धर्म यांच्या कार्यासाठी वापरला, तर देशाचा विकास होण्यास साहाय्य होईल. हिंदु राष्ट्रामध्ये असे खेळ असणार नाहीत.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे