चार पुरुषार्थ आणि पुरुषार्थाचे महत्त्व

अध्यात्मविषयक बोधप्रद ज्ञानामृत…

।। श्रीकृष्णाय नमः ।।

पू. अनंत आठवले

१. चार पुरुषार्थ

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्यांना शास्त्रात ‘चार पुरुषार्थ’ म्हटले आहे.

१ अ. धर्म आणि मोक्ष : धर्म आणि मोक्ष, ह्यांच्यात स्वतःचा पराक्रम, प्रयत्न, कर्तृत्व, म्हणजे पुरुषार्थ मुख्य आहे आणि प्रारब्ध गौण आहे. धर्माचरण आणि मोक्षप्राप्ती दैवाने, प्रारब्धाने होणार नाही; त्यासाठी निर्धाराने स्वतः प्रयत्न म्हणजे पुरुषार्थ करावा लागतो.

१ आ. अर्थ आणि काम : अर्थ आणि काम ह्यांची प्राप्ती मुख्यतः प्रारब्धावर अवलंबून असते, पुरुषार्थ गौण असतो. तरीही मनुष्य आपल्या पुरुषार्थाने प्रारब्धावर मात करून काही प्रमाणात अर्थ आणि काम प्राप्त करु शकतो, म्हणून अर्थ आणि काम ह्यांनासुद्धा पुरुषार्थात गणले आहे.

२. प्रयत्नांनी योग्य पुरुषार्थ करत राहणे

कार्यसिद्धीसाठी आपल्याकडून होतील तेवढे पूरे प्रयत्न करायला हवेत. ‘माझ्या भाग्यातच नाही’ असे म्हणून खचून जाणे योग्य राहणार नाही. पुरुषार्थावरच विसंबावे, दैवावर नाही. दैव आता आपल्या हाती नाही, पण पुरुषार्थ आपल्या हाती आहे.

योगवासिष्ठ ग्रंथात असे आले आहे की वसिष्ठमुनी श्रीरामांना सांगतात –

‘तावत्तावत्प्रयत्नेन यतितव्यं सुपौरुषम् ।
प्राक्तनं पौरुषं यावदशुभं शाम्यति स्वयम् ।।’

– योगवासिष्ठ, वैराग्यप्रकरणम्, सर्ग ५, श्लोक ११

अर्थ : ‘जोपर्यंत (आधीच्या अयोग्य -) पुरुषार्थाने बनलेले अशुभ भाग्य नष्ट होत नाही, तोपर्यंत स्वतः प्रयत्नाने योग्य पुरुषार्थ करीत राहावे.’

– अनंत आठवले (२८.४.२०२१)

(संदर्भ : लवकरच प्रकाशित होणार्‍या ‘पू. अनंत आठवले लिखित ग्रंथ ‘साधनेच्या विविध अंगांविषयी मार्गदर्शन !’ या ग्रंथातून)

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

(लेखक पू. अनंत आठवले हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. – संकलक)