(म्हणे) ‘भारताने ठरवावे कि तो तालिबानला मित्र मानतो कि शत्रू ?’ – तालिबान

  • एका छोट्याशा देशातील आतंकवादी संघटना भारताच्या संदर्भात अशी उद्दाम भाषा वापरते आणि भारत असली विधाने खपवून घेतो, हे लज्जास्पद ! तालिबानला अद्दल घडवण्यासाठी भारत सरकार कोणती पावले उचलणार ?
  • अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर तालिबानच्या आतंकवाद्यांना कंठ फुटला आहे. तालिबानची बोलती बंद करण्यासाठी त्याच्या उरात धडकी भरेल, अशी भारताने कारवाई करावी !

काबूल – सध्या तालिबान (‘तालिब’चा अर्थ इस्लामी कट्टरतावादावर विश्‍वास ठेवणारे विद्यार्थी’, असा आहे. ‘तालिब’चे अनेकवचन ‘तालिबान.’ ‘तालिबान’चा अर्थ ‘मागणारे’ असा होतो.) आणि अफगाणिस्तानचे सैन्य यांच्यात प्रचंड धुमश्‍चक्री चालू आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या मोठ्या भूभागावर नियंत्रण मिळवले आहे आणि देशाची राजधानी काबुलला त्यांनी घेरले आहे. या पार्श्‍वभूमीवर तालिबानचा कतारमधील दोहा येथील प्रवक्ता महंमद सोहिल शाहीन याला भारतातील ‘एन्.डी.टी.व्ही.’ या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने ‘भारताला तुम्ही मित्र मानता कि शत्रू ?’ असा प्रश्‍न विचारला. त्या वेळी ‘तुम्ही हे तुमच्या सरकारला विचारले पाहिजे की, ते तालिबानला मित्र मानतात कि शत्रू ? जर भारत अफगाणिस्तानमधील जनतेला आमच्या विरोधात लढण्यासाठी बंदुका, शस्त्रे आणि स्फोटके पुरवत असेल, तर आम्ही याकडे ‘वैर भावनेतून केलेली कारवाई’ अशा दृष्टीकोनातूनच पाहू; मात्र भारताने अफगाणिस्तानमधील शांतता आणि विकास यांसाठी काम केले, त त्याला आम्ही वैर भावना म्हणणार नाही. काय करायचे ते भारताने ठरवावे’, असे उद्दामपणे वक्तव्य केले. (भारताच्या विमान अपहरणाच्या वेळी कंदहार विमानतळावर तालिबानने भारतविरोधी आतंकवाद्यांना सर्वप्रकारचे साहाय्य केले होते. अशा तालिबानने भारताला प्रश्‍न विचारणे म्हणजे कांगावाच होय ! तालिबान भारताचा शत्रूच असून भारताने तालिबानचा निःपात करण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न करावेत ! – संपादक) तसेच ‘भारताने अफगाणिस्तानच्या विकासासाठी जे काही केले, त्यासाठी आम्ही भारताचे आभारी आहोत’, असेही त्याने स्पष्ट केले.

(म्हणे) ‘कोणत्याही देशाचे दूतावास आणि तेथील कर्मचारी यांना हानी पोचवणार नाही !’

ए.एन्.आय. या वृत्तसंस्थेशी बोलतांना शाहीन म्हणाला की, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणत्याही देशाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी केला जाणार नाही. तसेच कोणत्याही देशाचे दूतावास आणि तेथील कर्मचारी यांना कोणतीही हानी पोचवली जाणार नाही. हे आमचे वचन आहे. याविषयी आम्ही शब्द देतो, असेही तो म्हणाला. (तालिबानच्या या शब्दांवर कोण विश्‍वास ठेवणार ? विषाची परीक्षा कोण घेणार ? – संपादक)

(म्हणे) ‘पाकचा आम्हाला पाठिंबा नाही !’

शाहीन याने सांगितले की, पाकिस्तानचा आम्हाला पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे; मात्र या बातम्या चुकीच्या आहेत. हे केवळ राजकारण आहे. (खोटारडा तालिबान ! पाकचे नागरिक तालिबानला साहाय्य करत आहेत. तालिबान्यांच्या बाजूने ते लढत आहेत, हे पुराव्यानिशी उघड झालेले असतांना ते नाकारणे हा जगाच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचाच प्रयत्न होय ! – संपादक)

भारत आणि तालिबान यांच्यात चर्चा चालू असल्याची माहिती नाही !

‘भारताची तालिबानशी चर्चा चालू आहे का ?’ असा प्रश्‍न विचारल्यावर, ‘आम्हीही बातम्या ऐकल्या की, भारतीय अधिकारी दोहा आणि इतर ठिकाणी तालिबानशी चर्चा करत आहेत; मात्र याची निश्‍चित माहिती माझ्याकडे नाही.’

इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांना अनुमती देणार !

शाहीन याने पुढे सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यास आम्ही इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांसारख्या आतंकवादी संघटनांना काम करण्यास अनुमती देऊ. (एकीकडे ‘अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणत्याही देशाच्या विरोधात कारवाया करण्यास देणार नाही’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा याला अनुमती द्यायची हा दुटप्पीपणाच होय ! – संपादक)

भारताचे कौतुक !

शाहीन यने म्हटले की, भारताने अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी धरणे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्प आणि इतर विकास कामे केली. अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या आर्थिक संपन्नतेसाठी केलेल्या कामाचे आम्ही कौतुक करतो.

(म्हणे) ‘भारताने अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवल्यास वाईट परिणाम होतील !’ – तालिबान

भारतीय सैन्याची क्षमता काय आहे, हे सार्‍या जगाने पाहिले आहे. त्यामुळे भारताने उद्दाम तालिबानला आता योग्य धडा शिकवण्याची आवश्यकता आहे !

भारताने अफगाणिस्तान सरकारच्या साहाय्यासाठी त्याच्या सैन्याला अफगाणिस्तानमध्ये पाठवले आणि भारतीय सैन्य कायम येथेच रहाणार असेल, तर त्यांच्यासाठी हे चांगले नाही. अफगाणिस्तानमध्ये असलेल्या इतर देशांच्या सैनिकांची काय अवस्था झाली हे भारताने पाहिले असेल, असे शाहीन याने म्हटले आहे.