सनातनचे ४६ वे संत पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८३ वर्षे) यांनी साधकांना साधनेच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन !

श्रावण शुक्ल पक्ष पंचमी (१३ ऑगस्ट २०२१) या दिवशी सनातनचे ४६ वे संत पू. भगवंत कुमार मेनराय यांचा वाढदिवस आहे. एका नामजपाच्या सत्राच्या वेळी पू. भगवंत कुमार मेनराय यांनी साधकांना साधनेच्या संदर्भात पुढील अनमोल मार्गदर्शन केले.

पू. भगवंत कुमार मेनराय

पू. भगवंत कुमार मेनराय यांना ८३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. साधनेतील मुख्य अडथळे कोणते ?

स्वत:मधील स्वभावदोष आणि अहं हे साधनेतील प्रमुख दोन अडथळे आहेत.

२. स्वभावदोष आणि अहं यांच्या मुळाशी काय आहे ?

स्वभावदोष आणि अहं यांच्या मुळाशी इतरांकडून असणारी अपेक्षा आहे.

३. अपेक्षा न्यून कशी करणार ?

देवाला प्रार्थना करून त्याचा नामजप केल्यामुळे इतरांकडून असणार्‍या अपेक्षा न्यून होतात.

४. भगवंताच्या नामजपाचे महत्त्व

कु. मधुरा भोसले

भगवंताच्या नामाचे पुष्कळ महत्त्व आहे.

अ. भगवंताचा नामजप केल्यामुळे आपल्यातील आणि भगवंतातील अंतर न्यून होऊन आपण भगवंताशी लवकर एकरूप होतो.

आ. नामजपामुळे आपली लवकर आध्यात्मिक उन्नती होते. अनेक साधक वर्षानुवर्षे साधना करूनही त्यांची आध्यात्मिक उन्नती न होण्याचे कारण म्हणजे ते अखंड नामजप करत नाहीत. साधकांनी नामजप वाढवला, तर त्यांचे प्रारब्ध जळून त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होईल.

इ. आतापर्यंत अनेक भक्त, ऋषिमुनी आणि संत यांनी विविध मार्गांनी साधना करतांना भगवंताचा नामजप आवर्जून केला आहे; कारण त्यांना नामजपाचे महत्त्व माहिती होते. नामजपामुळे भक्त, ऋषिमुनी आणि संत ईश्वराशी एकरूप झाले आहेत.

अनुभूती

पू. मेनरायकाका वरील सूत्रे सांगत असतांना वातावरणात चंदनाचा सुगंध दरवळत होता आणि ‘ॐ’चा बारीक नाद ऐकू येत होता. ते भगवंताच्या नामजपाचे महत्त्व सांगत असल्यामुळे साक्षात् भगवंतच दैवी सुगंध आणि दैवी नाद यांच्या रूपाने नामजपाच्या खोलीत उपस्थित असल्याचे जाणवले.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२१.७.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक