गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासियांसाठी एस्.टी.च्या अधिकच्या गाड्या  उपलब्ध करा ! – संदेश पारकर, शिवसेना

एस्.टी.च्या अधिकच्या गाड्या कोकणात सोडा

कणकवली – गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून कोकणात मोठ्या संख्येने गणेशभक्त येतात. गणेशभक्तांची सोय होण्यासाठी एस्.टी.च्या अधिकच्या गाड्या कोकणात सोडाव्यात, तसेच या गाड्यांतून कोकणात येणार्‍यांना नेहमीपेक्षा अल्प दरात तिकीट मिळावे, अशी मागणी शिवसेनेचे येथील नेते संदेश पारकर यांनी महाराष्ट्राचे परिवहनमंत्री अधिवक्ता अनिल परब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

‘महापुरामुळे कोकणातील रस्त्यांची पुष्कळ दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुस्थितीत असलेल्या गाड्या पाठवणे आवश्यक आहे, याचाही विचार करावा’, असेही पारकर यांनी या निवेदनात म्हटले आहे.

‘सावंतवाडी बसस्थानकाचे काम पूर्ण करावे, दोडामार्ग आणि वैभववाडी या तालुक्यांसाठी नवीन आगरांची निर्मिती करावी, जिल्ह्यातील बांदा आणि कुडाळ येथील बसस्थानके व्यावसायिक तत्त्वावर चालू करण्यास अनुमती द्यावी, वर्ष २०१९ मध्ये साहाय्यक मेकॅनिक या पदांवर भरती झालेल्या १८ जणांना त्वरित सेवेत सामावून घ्यावे, जिल्ह्याला परिवहन विभागासाठी कायमस्वरूपी विभाग नियंत्रक नेमण्यात यावा, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि विजयदुर्ग येथे कायमस्वरूपी आगार व्यवस्थापक नेमावा, अधिकारी आणि कर्मचारी यांची रिक्तपदे त्वरित भरावीत’, या आणि अन्य मागण्या पारकर यांनी मंत्री परब यांच्याकडे या निवेदनाद्वारे केल्या आहेत.