देवद आश्रमातील सनातनचे १९ वे संत पू. रमेश गडकरी (वय ६४ वर्षे) यांच्या आजारपणाच्या वेळी त्यांची सेवा करतांना त्यांच्या पुतण्याला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘१५ ते २५.१०.२०२० या कालावधीत माझे काका पू. रमेश गडकरी यांच्या (पू. आबांच्या) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण न्यून म्हणजे ५ ग्रॅम प्रती १०० मि.ली. इतके झाल्याने त्यांना पुणे येथील एका रुग्णालयात भरती करण्यात आले होते. (पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे सर्वसाधारण प्रमाण १४ ते १८ ग्रॅम प्रती १०० मि.ली. असते.) तेव्हा मी पू. आबांच्या सेवेत होतो.
श्रावण शुक्ल पक्ष चतुर्थी (१२.८.२०२१) या दिवशी त्यांचा ६४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या सेवेत असतांना मला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. रुग्णालयातील इतर रुग्णांपेक्षा पू. आबांचा (पू. गडकरीकाकांचा) वेगळेपणा दर्शवणारी त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे
अ. ‘रुग्णालयात सगळे जण पू. आबांना (पू. गडकरीकाकांना) ‘बाबा’ म्हणून हाक मारायचे. परिचारिका आणि आधुनिक वैद्य पू. आबांशी अन्य रुग्णांपेक्षा अधिक आपुलकीने बोलायचे अन् त्यांची काळजी घ्यायचे.
आ. मला अन्य रुग्णांकडे बघणेही नकोसे वाटायचे. ते सतत झोपलेले असत. ते त्रासलेले दिसायचे. पू. आबा मात्र सतत प्रसन्न आणि उत्साही होते.
इ. ‘पू. आबांना काही शारीरिक व्याधी आहे किंवा त्यांना काही त्रास होत आहे’, असे वाटतच नव्हते. ते वेळेवर उठायचे, वैयक्तीक आवरायचे आणि जेवायचे. त्यामुळे मला कधीच कंटाळा आला नाही. ‘दिवस कधी संपायचा ?’, हे माझ्या लक्षातच यायचे नाही.
ई. रुग्णालयातील कक्षात (‘वॉर्ड’मध्ये) दृष्टी फिरवल्यावर सर्वप्रथम पू. आबांच्या पलंगाकडे लक्ष जायचे. त्यांचा पलंग सतत प्रकाशित आणि चैतन्यमय जाणवायचा.
२. पू. आबांनी साधकाला पलंगावर चादर घालायला शिकवणे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पलंगावर चादर घातल्यावर ती न विस्कटणे
रुग्णालयात असतांना पू. आबांनी मला पलंगावर ‘चादर कशी घालायची ?’, हे शिकवले. मी त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार चादर घातल्यावर ती विस्कटत नसे. त्यामुळे पू. आबांच्या पलंगावरील चादर परिचारिकांना कधीच नीट करावी लागली नाही. त्या इतरांना ‘पू. आबांचा पलंग किती नीटनेटका आहे !’, हे बघायला सांगत.
३. आलेल्या अनुभूती
३ अ. पू. आबांच्या रक्ताची तपासणी करण्यासाठी त्यांचे रक्त काढतांना प्रयत्न करूनही त्यांच्या शरिरातून रक्त न निघणे आणि त्यांनी देवाला प्रार्थना केल्यावर आवश्यक तेवढे रक्त मिळणे : परिचारिका पू. आबांच्या रक्ताची तपासणी करण्यासाठी त्यांचे रक्त काढत होती. तेव्हा त्यांच्या शरिरातून रक्तच निघत नव्हते. असे २ – ३ वेळा झाल्यावर पू. आबांनी देवाला प्रार्थना केली. तेव्हा जेवढे आवश्यक होते, तेवढे रक्त लगेच मिळाले. त्या वेळी ‘प्रत्येक कृती करतांना देवाचे साहाय्य घेणे किती आवश्यक आहे !’, हे माझ्या लक्षात आले.
३ आ. पू. आबांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व कुठे जाणवते ?’, हे अनुभवायला सांगितल्यावर साधकाला आलेल्या अनुभूती
३ आ १. कक्षामध्ये सगळीकडेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे : रुग्णालयात गेल्यावर पू. आबांनी मला एक भाववृद्धी प्रयोग करायला सांगितला. त्यांनी मला ‘परम पूज्यांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अस्तित्व कुठे जाणवते ?’, हे अनुभवायला सांगितले. तेव्हा मला कक्षामध्ये सगळीकडेच परम पूज्यांचे अस्तित्व जाणवायला लागले.
३ आ २. ‘पूर्ण कक्षामध्ये काळोख पसरला असून केवळ पू. आबांच्या पलंगावर लख्ख प्रकाश आणि चैतन्य आहे’, असे मला दिसत होते.
यातून ‘संतांनी करायला सांगितलेल्या कृतीमागे त्यांची संकल्पशक्ती कार्यरत असते’, हे मला अनुभवता आले.
‘देवाच्या कृपेने मला संतसेवेची संधी मिळाली. देवाने या सेवेतून मला बर्याच गोष्टी शिकवल्या’, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. ऋतुराज गडकरी (पुतण्या), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (डिसेंबर २०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |