जिल्हाधिकार्‍यांशी बोलून प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्‍यांचे ध्वज जप्त करण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना देऊ ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांना निवेदन देतांना श्रीमती मधुरा तोफखाने आणि सौ. सुलभा तांबडे

सांगली, ११ ऑगस्ट (वार्ता.) – प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विक्री करण्यास बंदी असूनही बाजारात असे ध्वज विकणार्‍यांवर कारवाई केली जात नाही, हे गंभीर आहे. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांशी बोलून प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्‍यांचे ध्वज जप्त करण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना देऊ, असे आश्वासन भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने आणि सौ. सुलभा तांबडे यांनी १० ऑगस्ट या दिवशी आमदार श्री. गाडगीळ यांना राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात निवेदन दिले. याच मागणीचे निवेदन भाजपच्या नगरसेविका सौ. उर्मिला बेलवकर यांनाही देण्यात आले.

महिलांचे ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ याविषयी प्रबोधन !

भाजपच्या नगरसेविका सौ. उर्मिला बेलवकर (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्रीमती मधुरा तोफखाने

भाजपच्या नगरसेविका सौ. उर्मिला बेलवकर यांनी पक्षाच्या वतीने महिलांचे प्रबोधन करण्यासाठी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात श्रीमती मधुरा तोफखाने यांनी महिलांचे ‘राष्ट्रध्वज’ विषयाच्या संदर्भात प्रबोधन केले. मार्गदर्शन ऐकल्यावर एका महिलेने सांगितले, ‘‘आम्ही राष्ट्रप्रेम वाढण्यासाठी राष्ट्रध्वज लहान मुलांच्या हातात देत होतो; मात्र यातून नेमकी अयोग्य कृती कशी होते, ते आमच्या आज लक्षात आले. यापुढे राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, याची आम्ही काळजी घेऊ.’’