कथित धर्मविरोधी घोषणाबाजी केल्याच्या प्रकरणात भाजपचे नेते अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय यांच्यासह ६ जणांना अटक

देहली येथे इंग्रजांच्या काळातील कायदे रहित करण्यासाठी ‘भारत जोडो आंदोलना’चे केले होते आयोजन !

नवी देहली – येथील जंतर मंतर परिसरात ८ ऑगस्ट या दिवशी देशातील इंग्रजांच्या काळातील कायदे रहित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत जोडो आंदोलना’च्या वेळी एका विशिष्ट धर्माच्या विरोधात कथित चिथावणीखोर घोषणा दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ६ जणांना अटक केली. यात या आंदोलनाच्या आयोजकांपैकी एक असणारे भाजपचे नेते आणि सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय यांचा समावेश आहे. त्यांच्या व्यतिरिक्त विनोद शर्मा, दीपक सिंह, दीपक, विनीत क्रांती आणि प्रीत सिंह यांना अटक करण्यात आली आहे. प्रीत सिंह हे ‘सेव्ह इंडिया फाऊंडेशन’चे संचालक आहेत. देहली पोलिसांनी या सर्वांची १० ऑगस्टला सकाळपासून चौकशी चालू केल्यानंतर त्यांना अटक केली. तसेच पोलीस हिंदु रक्षा दलाचे श्री. पिंकी चौधरी यांचाही शोध घेत आहेत. या सर्वांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ आणि १८८ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आंदोलनाच्या वेळी उपस्थितांनी एका विशिष्ट धर्माच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
याविषयी आंदोलनाच्या प्रसारमाध्यम प्रभारी क्षिप्रा श्रीवास्तव यांनी सांगितले की, आंदोलनाचे नेतृत्व अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय यांनी केले; मात्र त्यांचा धर्मविरोधी घोषणा देणार्‍यांशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले आहे.

व्हिडिओची सत्यता पडताळली पाहिजे ! – अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय

उजवीकडे अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय

अटकेपूर्वी याविषयी अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय म्हणाले होते की, व्हिडिओची सत्यता पडताळली पाहिजे. जर त्यात तथ्य असेल, तर संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. जर व्हिडीओ बनावट असेल, तर तो बनवणार्‍यांवर कारवाई करावी. मी हा व्हिडिओ अनेक वेळा पाहिला आहे; पण त्या घोषणा देणार्‍यांचा शोध लागलेला नाही. पोलिसांनी याची चौकशी करून त्यावर कारवाई करावी. चौकशी केली, तर आम्ही अन्वेषणास पूर्ण सहकार्य करू. माझी प्रकृती ठीक नाही, तरीदेखील पोलिसांच्या सांगण्यावरून मी चौकशीसाठी पोचलो आहे. आमचा दोष एवढाच आहे की, आम्ही ‘भारत छोडो दिन’ साजरा करण्यासाठी आणि इंग्रजांच्या कायद्यावर आक्षेप घेण्यासाठी गेलो होतो.