राज्यात गुंडांची कोणतीही टोळी नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यात गुंडांची टोळी कार्यरत नाही

पणजी – राज्यात गुंडांची टोळी कार्यरत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘‘राज्यात गुंडांची टोळी असणारी कोणतीही घटना नोंदवण्यात आलेली नाही. याविषयी कोणती तक्रारही आलेली नाही; मात्र सावधगिरीचे उपाय म्हणून पोलिसांकडून दिवसरात्र पीसीआर् व्हॅन्सद्वारे गस्त, हमरस्त्यावर गस्त (हायवे पेट्रोलींग), तसेच दुचाकीवरून आणि पायी गस्त घालण्यात येते. अशा पद्धतीने होणारे गुन्हे रोखण्यासाठी आणि त्यावर कारवाई करण्यासाठी खबरे नेमण्यात आले असून त्यांच्याकडून माहिती गोळा करण्यात येते. अमली पदार्थांच्या गुन्ह्याविषयी खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. या कायद्यानुसार गुन्हे नोंद करतांना कायद्यातील विशिष्ट तरतुदींचे पालन करावे लागते. सीमा तपासणी नाक्यावरील, तसेच इतर अधिकार्‍यांना सतर्क रहाण्याचे आदेश देण्यात आले असून कुणीही अवैधरित्या हत्यार बाळगत असेल, तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.’’