धार्मिक विधीच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना औक्षण करतांना आणि त्यानंतर साधिकेला आलेली अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे औक्षण करण्याची सेवा मिळाल्यावर साधिका सौ. सौम्या कुदरवळ्ळी यांचे मन निर्विचार झाले; मात्र त्यापेक्षा समष्टीचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांना सूक्ष्मातील परात्पर गुरुदेवांनी मार्गदर्शन केले. तसे प्रयत्न केल्यावर त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. सौम्या कुदरवळ्ळी

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना औक्षण करण्याचा निरोप मिळाल्यावर भावजागृती होऊन मन निर्विचार होणे

‘एका धार्मिक विधीच्या अंतर्गत परात्पर गुरु डॉ. आठवले यांना औक्षण करण्याचा मला निरोप मिळाला. तेव्हा माझी भावजागृती होऊन मन निर्विचार झाले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले सर्वाेच्च अशा शिवदशेत असतांनाही ते साधकांवरील प्रीतीमुळे जीवदशेत येत असल्याचे साधिकेला जाणवणे

थोड्या वेळाने ‘मी तुम्हाला ओवाळतांना काय भाव ठेवू ? माझे मन तर निर्विचार झाले असून त्यात मला आनंद मिळत आहे’, असे मी परात्पर गुरु डॉक्टरांना आत्मनिवेदन केले. त्या वेळी ते मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘व्यष्टीच्या दृष्टीने निर्विचार ही एक अवस्था आहे. तुला प्रार्थना करून समष्टीचा विचार करायचा आहे. त्यातूनच तू घडणार आहेस. त्यासाठी ‘स्वतःच्या स्थितीतून बाहेर येऊन समष्टीला काय आवश्यक आहे ?’ याचा विचार करायला पाहिजे.’’ त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर सर्वाेच्च अशा शिवदशेत असतांना ते साधकांसाठी, साधकांच्या चुका लक्षात आणून देण्यासाठी आणि साधकांना घडवण्यासाठी जीवदशेत येतात.’ असे करणे कठीण असूनही ते ‘केवळ साधकांवरील प्रीतीमुळे असे करतात’, असे मला जाणवले.

३. परात्पर गुरुदेवांना अपेक्षित असे सर्व घडण्यासाठी प्रार्थना होणे आणि त्यात आनंद घेण्याचे ठरवल्यावर अंगावर पूर्वी न बसणारे दागिनेही व्यवस्थित बसणे

आता माझ्या मनात काही विचार येत नव्हते. मी देवाच्या चरणी क्षमा मागत होते आणि माझ्याकडून एकच प्रार्थना सारखी होत होती ‘परात्पर गुरुदेव, आपल्याला अपेक्षित असे सर्व घडू दे.’ मी त्यातला आनंद घेण्याचे ठरवले. त्यानंतर औक्षण करतांना मला घालण्यासाठी दागिने निवडायचे होते. माझे दागिने मला अनेक वर्षांपासून व्यवस्थित बसत नव्हते, उदा. माझे कानातले माझ्या कानांच्या छिद्रांत जात नव्हते; पण त्या दिवशी ते व्यवस्थित बसले. त्यासाठी मला पुष्कळ काही करावे लागले नाही.

४. औक्षण करतांना स्वतःचे अस्तित्व नष्ट होऊन मन निर्विचार होणे आणि औक्षणाची कृती गुरुमाऊलींनी करवून घेतल्याचे जाणवणे

औक्षण करण्यासाठी उभे राहिल्यावर माझे अस्तित्व पूर्णपणे नष्ट झाले. माझ्या सभोवतालच्या हालचाली थांबल्याचे जाणवले. मला जगच जणू थांबल्यासारखे वाटले. माझी पूर्ण निर्विचार स्थिती होती. ‘माझे हात आपोआप हालत आहेत. माझ्या तोंडवळ्यावर आपोआप हावभाव निर्माण होत आहेत आणि हे सर्व साक्षात् गुरुमाऊली करवून घेत आहे’, असे मला प्रकर्षाने जाणवले.

५. औक्षण करतांना कितीतरी युगांपासून या क्षणाची वाट पहात असल्याचे वाटून कृतज्ञताभाव जागृत होणे

गुरुदेवांच्या तोंडवळ्यावरील स्मित, तेज आणि प्रीतीच्या लहरी माझ्या अंतरातील ज्योत प्रज्वलित करत होत्या. दीड मिनिटाचा तो क्षण एक युगासारखा वाटत होता. ‘किती युगांपासून मी या क्षणाची वाट पहात होते’, असे वाटून माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.

६. ताट आणि दिवा यांतून पुष्कळ चैतन्य जाणवणे अन् परीक्षण करतांना ध्यान लागणे

औक्षण केल्यानंतर मला औक्षणाचे ताट आणि दिवा यांतून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवत होते. मी हातांत ताट धरून किमान ३० मिनिटे ‘युएएस्’(UAS) परीक्षणासाठी (‘रिडींग’साठी) उभी होते. त्या वेळी माझे ध्यान लागत होते. माझी निःशब्द आणि निर्विचार स्थिती होती.

७. रात्री उशिरापर्यंत उत्साहाने सेवा करणे आणि ओवाळण्याचा प्रसंग स्वप्नासारखा वाटणे

रात्री १२.३० वाजेपर्यंत मला ही सेवा होती, तरीही सकाळपेक्षा मला रात्री अधिक उत्साह जाणवत होता. दुसर्‍या दिवशी सकाळी झोपेतून उठतांना ‘अजूनही मी परात्पर गुरुदेवांना ओवाळत आहे’, असे मला दृश्य दिसत होते. तेव्हा ‘कालचा औक्षणाचा प्रसंग हे स्वप्न तर नव्हते ना ?’, असे मला वाटले आणि मला नेहमीपेक्षा अधिक उत्साह जाणवला.

हे लिखाण करतांना माझे ध्यान लागत होते. मला पुष्कळ प्रयत्नपूर्वक शब्द लिहावे लागत आहेत. जे अनुभवले ते शब्दांत व्यक्त करणे फारच कठीण आहे. परात्पर गुरुमाऊली, मी काहीच प्रयत्न करत नाही, तरीही तुम्ही या जिवावर एवढी कृपा कशी करू शकता ? तुम्ही नारायण आहात, सर्वांचे आधारस्तंभ आणि सर्वांचे रक्षक आहात. आम्ही सर्व जीव तुम्हालाच शरण आलो आहोत. आमचा उद्धार करा. तुम्ही आमच्यासाठी जे काही करत आहात, त्यासाठी तुमच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’

– सौ. सौम्या कुदरवळ्ळी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक