पणजी, ६ ऑगस्ट (वार्ता.) – भाजपचे माजी उद्योगमंत्री आणि वर्ष २०१९ मध्ये काँग्रेसवासी झालेले शिरोड्याचे महादेव नाईक यांनी देहली येथे देहली सरकारचे वीजमंत्री सत्येंद्र जैन यांच्या उपस्थितीत ‘आप’मध्ये प्रवेश केला. या वेळी महादेव नाईक म्हणाले, ‘‘गोव्यात पुढील सरकार ‘आप’चे असणार आहे.’’ महादेव नाईक यांनी या वेळी काँग्रेसच्या १० आमदारांना फोडून भाजपात प्रवेश दिल्याने भाजपावर टीका केली.
महादेव नाईक हे वर्ष २००९ आणि वर्ष २०१२ मध्ये शिरोडा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले होते. त्यानंतर भाजपच्या लक्ष्मीकांत पार्सेकर शासनात त्यांच्याकडे उद्योग, सहकार आदी महत्त्वाची मंत्रीपदे होती. वर्ष २०१९ मध्ये शिरोडा मतदारसंघाचे सध्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी काँग्रेसच्या आमदारकीचे त्यागपत्र देऊन भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे त्या वर्षी शिरोडा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली आणि तेव्हा महादेव नाईक यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. महादेव नाईक यांनी आता काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचे त्यागपत्र देऊन ‘आप’मध्ये प्रवेश केला आहे.
वेळ्ळी मतदारसंघाचे माजी अपक्ष आमदार बेंजामिन सिल्वा यांच्या काँग्रेस प्रवेशाला स्थानिकांचा विरोध
वर्ष २०१२ मध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर शासनाला पाठिंबा दिलेले माजी आमदार बेंजामिन सिल्वा यांच्या काँग्रेस पक्षातील प्रवेशाला काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी मान्यता दिलेली आहे; मात्र मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला आहे.