उद्या आषाढ अमावास्या (८.८.२०२१) या दिवशी श्री. ज्ञानदीप गोरख चोरमले याचा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, युवा शिबिरांमध्ये सहभागी झाल्याने त्याच्यात झालेले पालट आणि त्याला आलेली अनुभूती येथे दिली आहे.
श्री. ज्ञानदीप चोरमले याला १९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. ज्ञानदीपची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. ‘ज्ञानदीप लहानपणापासूनच सहनशील, समजूतदार, प्रामाणिक, नम्र आणि आज्ञाधारक आहे. त्याला कुणी कितीही रागावले, तरी तो संयमाने वागतो.
१ आ. प्रेमभाव
१. ज्ञानदीप माझे पाय दुखत असल्यास चेपून देतो.
२. एकदा मी घरी एक पदार्थ बनवला होता. तो थोडाच होता. तेव्हा मी ज्ञानदीपला म्हणाले, ‘‘थोडाच खाऊ आहे. त्यामुळे तो आपण दोघे खाऊया.’’ तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘मावशीला आणि आजीला खाऊ दे अन् राहिलेला तू खा. मला खाऊ नाही राहिला, तरी चालेल.’’ त्याचे हे बोलणे ऐकून माझा कंठ दाटून आला.
१ इ. मला आध्यात्मिक त्रास होत असल्यास तो नामजपादी उपाय करण्यासाठी साहाय्य करतो.
१ ई. लहानपणापासूनच ज्ञानदीपला कपडे, खेळणी, पैसे आणि खाद्यपदार्थ यांविषयी आसक्ती नाही.
१ उ. सेवाभाव
१ उ १. ज्ञानदीप लहानपणापासूनच माझ्या समवेत नामजप करायचा आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या ठिकाणी सेवेसाठी यायचा.
१ उ २. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना विविध सेवा करणे : ज्ञानदीप इयत्ता ११ वी आणि १२ वी मध्ये इंदापूर (जिल्हा पुणे) येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्या वेळी इंदापूर येथून घरी शिरसोडी (तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) येथे येतांना तो ‘दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’, तसेच सात्त्विक उत्पादने अन् प्रसारसाहित्य आणणे, साधकांना दुचाकीवरून सत्संगाला घेऊन जाणे आणि परत आणणे, तसेच अध्यात्मप्रसाराच्या अंतर्गत फलक लिहून लावणे’ इत्यादी सेवा मनापासून करत होता.
१ ऊ. ज्ञानदीपने इयत्ता १० वीत असतांना अभ्यासाच्या समवेत व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमितपणे करणे आणि ९३ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकावणे : ज्ञानदीप इयत्ता १० वीत असतांना दिवसभर शाळा असल्याने रात्री जागून अभ्यास करायचा; परंतु रात्री कितीही उशीर झाला, तरीही तो ‘नामजप करणे, प्रतिदिन स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठीचे सारणी लिखाण करणे, प्रायश्चित्त घेणे’, हे सर्व करत होता. त्याने व्यष्टी साधनेत कधीही सवलत घेतली नाही. हे सर्व करूनही ज्ञानदीपने इयत्ता १० वीत ९३ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक मिळवला.
१ ऊ १. दहावीत शाळेत प्रथम क्रमांक पटकावल्यावर शिक्षकांनी ज्ञानदीपचे केलेले कौतुक ! : ज्ञानदीप शाळेतील शिक्षकांचा अतिशय लाडका होता. दहावीत शाळेत प्रथम क्रमांक आल्यावर त्याचा सत्कार झाला. तेव्हा तेथील शिक्षक म्हणाले, ‘‘२० वर्षांपासून ही शाळा (शिरसोडी (तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) येथील विवेकानंद विद्यालय) चालू आहे. तेव्हापासून आतापर्यंत एवढे गुण केवळ ज्ञानदीपनेच मिळवले आहेत.’’
१ ऊ २. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळेच माझा शाळेत पहिला क्रमांक आला’, असा ज्ञानदीपचा भाव आहे.
१ ए. परात्पर गुरुदेवांप्रतीचा भाव : एकदा मी ज्ञानदीपला सहज म्हणाले, ‘‘तुझी मजा आहे हं ! शेत, घर आणि जनावरे हे सगळे तुझेच आहे.’’ त्या वेळी ज्ञानदीप मला म्हणाला, ‘‘मी परात्पर गुरुदेवांचा आहे आणि मी हे सर्व मनातून परात्पर गुरुदेवांना आधीच अर्पण केले आहे.’’
२. युवा शिबिरांमध्ये सहभागी झाल्याने ज्ञानदीपमध्ये झालेले पालट
२ अ. ज्ञानदीपने मिरज आश्रमात झालेल्या युवा शिबिरात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकून ती राबवण्यास आरंभ करणे अन् त्यानंतर त्याच्यामध्ये चांगले पालट झाल्याचे जाणवणे : ‘युवा साधकांना साधना कळावी आणि त्यांना साधनेची गोडी लागावी’, या उद्देशाने वर्ष २०१७ मध्ये दिवाळीच्या सुटीच्या कालावधीत मिरज येथील सनातनच्या आश्रमात ‘युवा साधकांचे शिबिर’ आयोजित केले होते. या शिबिरासाठी ज्ञानदीप त्याची मोठी बहीण कु. प्रीती हिच्या समवेत गेला होता. ज्ञानदीप त्या वेळी इयत्ता १० वीत शिकत होता. या शिबिरामध्ये युवा साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवण्यात आली होती. ज्ञानदीपसाठी हे सर्व नवीन होते; परंतु ४ – ५ दिवसांतच त्याने ही प्रक्रिया पुष्कळ चांगल्या प्रकारे शिकून घेतली. तेव्हापासून त्याने स्वभावदोष-निर्मूलनासाठीचे सारणी लिखाण चालू केले आहे. या शिबिराला जाऊन आल्यानंतर ज्ञानदीपमध्ये पुष्कळ पालट झाल्याचे मला जाणवले.
२ आ. रामनाथी आश्रमात झालेल्या युवा शिबिरांच्या वेळी ज्ञानदीपला संतांचा सत्संग लाभणे आणि या शिबिरानंतर त्याच्या मनात साधना करण्याविषयी सकारात्मकता निर्माण होणे : ज्ञानदीप ११ वीत (वर्ष २०१८) आणि १२ वीत (वर्ष २०१९) शिकत असतांना दिवाळीच्या सुटीत रामनाथी आश्रमात युवा साधकांची शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही शिबिरांसाठी ज्ञानदीप त्याची मोठी बहीण कु. प्रीती हिच्या समवेत गेला होता. त्या वेळी त्यांना संतांचा सत्संग लाभला. घरी आल्यानंतर ज्ञानदीप सत्संगाविषयी सांगत असतांना ‘त्याला पुष्कळ आनंद झाला आहे आणि तो आनंद ज्ञानदीप शब्दांत सांगू शकत नाही’, असे मला जाणवले. या शिबिराला जाऊन आल्यापासून ज्ञानदीपच्या मनात साधना करण्याविषयी सकारात्मकता निर्माण झाली आहे.
३. अनुभूती
सोलापूर येथे झालेल्या सभेची सेवा करून रात्री उशिरा बसने येत असतांना ज्ञानदीपला बसमध्ये स्वामी समर्थांचे भक्त असलेले प्रेमळ आजी-आजोबा भेटणे आणि ‘त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले ज्ञानदीपच्या समवेत होते’, असे साधिकेला जाणवणे : वर्ष २०१८ मध्ये सोलापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली होती. तेव्हा ज्ञानदीप १६ वर्षांचा होता. तो २ – ३ दिवस सभेच्या सेवेसाठी गेला होता. सेवा करून रात्री तो सोलापूरहून एकटाच बसने घरी येत होता. त्याला घरी येण्यास रात्रीचे १२ वाजले होते. घरी आल्यावर त्याने मला सांगितले, ‘‘मी ज्या बसमधून आलो, त्या बसमध्ये एक आजी-आजोबा होते. ते ओळखीचे नसूनही माझ्याशी पुष्कळ प्रेमाने वागले. ते आजी-आजोबा स्वामी समर्थांचे भक्त होते. त्यांनी मला खाऊ दिला.’’ हे ऐकल्यावर मला वाटले, ‘साक्षात् परम पूज्यच (परात्पर गुरु डॉ. आठवले) रात्रीच्या वेळी त्याच्या समवेत होते.’
४. ज्ञानदीपचे स्वभावदोष
ताण घेणे आणि प्रतिमा जपणे.
‘हे परमेश्वरा, तूच मला ज्ञानदीपविषयी लिहिण्याची संधी दिलीस. ‘ज्ञानदीप मायेत अडकत नाही’, ही केवळ तुझीच कृपा आहे. ‘तू ज्ञानदीपला तुझ्या चरणी अर्पण करून घे’, अशी प्रार्थना आहे.’
– सौ. अश्विनी गोरख चोरमले (आई), शिरसोडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. (जुलै २०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |