समंजस, व्यष्टी साधना गांभीर्याने करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. स्नेहल सुनील सोनीकर !

‘आषाढ कृष्ण पक्ष त्रयोदशी (६.८.२०२१) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या कु. स्नेहल सुनील सोनीकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आईला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. स्नेहल सोनीकर

कु. स्नेहल सुनील सोनीकर यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. समंजस

‘स्नेहल ७ वर्षांची असतांना आम्ही सनातनच्या माध्यमातून साधना आणि सेवा करू लागलो. त्या वेळी माझ्याकडील सेवा वाढत गेल्यामुळे मला स्नेहलला अपेक्षित वेळ देता येत नसे; पण त्याविषयी तिने माझ्याकडे कधीही गार्‍हाणे केले नाही.

२. ‘आईला सेवा करता यावी’, यासाठी लहान बहिणीला सांभाळणे आणि आईला घरकामात साहाय्य करणे

स्नेहलमुळेच मी दायित्व घेऊन सेवा करू शकले. मी सेवेनिमित्त ७ – ८ घंटे बाहेर असे. तेव्हा कु. सानिका (स्नेहलची लहान बहीण) १ वर्षाची होती. सानिकाचा स्वभाव हट्टी होता. तेव्हा स्नेहल सानिकाला सांभाळायची. ती सानिकाचा अभ्यास घ्यायची आणि तिच्याकडून स्तोत्रे म्हणवून घ्यायची. ती मला ‘केर काढणे, लादी पुसणे आणि कपड्यांच्या घड्या घालणे’, यांसाठी साहाय्य करायची.

३. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

स्नेहल प्रतिदिन वहीत नामजप लिहिल्याविना झोपत नसे. तिला स्तोत्रे म्हणण्याची आवड होती. ती नियमितपणे १ – २ चुका लिहून मला दाखवत असे. ती अधूनमधून माझ्या समवेत अध्यात्मप्रसाराच्या सेवेलाही येत असे. स्नेहल ८ व्या इयत्तेत शिकत असतांना तिने स्वतःच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवली. ती नियमितपणे दैनंदिनी लिहू लागली आणि नियोजनानुसार कृती करू लागली. नियोजनाप्रमाणे कृती करतांना तिला काही अडचणी आल्यास ती सहजपणे स्वीकारायची आणि त्यातून मार्ग काढायची. ती नियमितपणे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करायची.

४. शाळेतील शिक्षिका आणि मैत्रिणी यांना साधना सांगून त्यांना स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व सांगणे

सौ. स्वाती सोनीकर

स्नेहल तिच्या शाळेतील शिक्षिका आणि मैत्रिणी यांना साधनेविषयी माहिती सांगत असे. ती मैत्रिणींमध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेषांक आणि ‘सनातन वह्या’ यांचे वितरण करत असे. ती मैत्रिणींना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व सांगत असे. त्यामुळे त्यांना त्यात गोडी निर्माण झाली होती. स्नेहलच्या मैत्रिणी तिला त्यांच्याकडून झालेल्या चुका प्रांजळपणे सांगायच्या. त्यांनी स्नेहलकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी स्वयंसूचना सिद्ध करण्याची पद्धत शिकून घेतली होती.

५. सेवेची आवड

ती ‘सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, गुरुपौर्णिमेचा प्रसार करणे, गुरुपौर्णिमेच्या वेळी नाटिकेत भाग घेणे’, या सेवा आवडीने करायची.

६. आदर्श विद्यार्थिनी

तिने व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. स्नेहल शाळेत ‘आदर्श विद्यार्थिनी’ म्हणून ओळखली जायची. ती त्याचे श्रेय श्रीकृष्ण आणि गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांना देते. त्यात तिचा कुठेही स्वकौतुकाचा भाग जाणवत नाही.

७. धाडसी

ती दहाव्या इयत्तेत शिकत असतांना शाळेत चालत जात असे. एकदा तिला एक अनोळखी व्यक्ती ‘रिक्शाने शाळेत सोडतो’, असे पुनःपुन्हा सांगत होती. ‘स्नेहल येत नाही’, हे लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीने तिचा हात धरला. तेव्हा स्नेहलने क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीचा हात जोरात झटकला. ती व्यक्ती घाबरली आणि पुढील प्रसंग टळला.

८. अन्यायाविरुद्ध चीड

कुठे अन्याय होत असल्याचे लक्षात आल्यावर स्नेहल अस्वस्थ होते. ‘तिची मैत्रीण ‘लव्ह-जिहाद’ला बळी पडत आहे’, हे लक्षात आल्यानंतर ते थांबवण्यासाठी तिने पुष्कळ प्रयत्न केले.

९. वडिलांना व्यवसायात साहाय्य करणे

तिच्या बाबांची नोकरी गेल्यामुळे त्यांनी पुन्हा नोकरी न करता ‘केटरिंग’चा (गिर्‍हाईकाच्या मागणीनुसार पुष्कळ लोकांचा स्वयंपाक करून देण्याचा) व्यवसाय करण्याचे ठरवले. स्नेहल जेवढे शक्य होईल, तेवढे त्यांना साहाय्य करत असे.

१०. भाव

१० अ. ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्याकडून अभ्यास करवून घेत आहेत आणि तेच मला शक्ती देत आहेत’, असा स्नेहलचा भाव असणे : तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर तिने ‘कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंट’ (C.M.A.) आणि ‘बी.कॉम’ यांचे शिक्षण एकाच वेळी घेण्याचा निर्णय घेतला. ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्याकडून अभ्यास करवून घेत आहेत आणि तेच मला शक्ती देत आहेत’, असा तिचा भाव होता. स्नेहल साधना म्हणून एकाग्रतेने अभ्यास करत असे.

१० आ. ‘केवळ गुरूंच्या कृपेने उत्तीर्ण झाले’, असा स्नेहलचा भाव असणे : तिला कोणतीही शिकवणी नसतांना आणि महाविद्यालयात विलंबाने प्रवेश मिळाला असूनही ‘बी.कॉम.’च्या दुसर्‍या वर्षीच्या आणि ‘सी.एम्.ए.’च्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली. (सामान्यतः ‘सी.एम.ए.’च्या परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे.) ‘मी केवळ गुरूंच्या कृपेने उत्तीर्ण झाले’, असा तिचा भाव होता.

११. पूर्णवेळ सेवा करण्यासाठी रामनाथी आश्रमात येणे

वर्ष २०१९ मध्ये आम्ही रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करण्यासाठी आलो. तेव्हा स्नेहलला अध्यात्मप्रसाराची सेवा मिळाली. त्या वेळी तिला पुष्कळ आनंद झाला.

१२. स्नेहलला आलेल्या अनुभूती

१२ अ. आई सेवेला गेल्यावर घरी एकटी असतांना स्नेहलने प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावणे आणि त्या वेळी ‘प.पू. भक्तराज महाराज समवेत आहेत’, असे तिला वाटणे : स्नेहल ७ वर्षांची असतांना मी स्नेहलला घरात एकटी ठेवून प्रसाराला जात होते. मी घरी आल्यानंतर स्नेहल सांगायची, ‘‘मला कंटाळा आल्यास मी प.पू. भक्तराज महाराज यांची (प.पू. बाबांची) भजने लावते. ‘प.पू. बाबा माझ्या समवेत आहेत’, असे मला वाटते आणि माझा कंटाळा नाहीसा होतो.’’

१२ आ. महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना ती एकाग्रतेने अभ्यास करत असे. तेव्हा तिचे हात, तोंडवळा आणि पुस्तकाची पाने यांवर अनेक चंदेरी अन् सोनेरी या रंगांचे दैवी कण दिसायचे.’

– सौ. स्वाती सुनील सोनीकर (आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.७.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक