लोकांचे मनःस्वास्थ्य जपण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मंदिरे खुली करा ! – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट

पुणे, ५ ऑगस्ट – मंदिरांमध्ये होणारे देवाचे दर्शन, प्रार्थना, धार्मिक वातावरण हे सर्व भाविकांच्या श्रद्धा जपणारे असल्याने लोकांमध्ये असलेली कोरोनाच्या साथीविषयीची भीती दूर व्हायला साहाय्य होईल, तसेच काही आजारांनंतर मानसिक स्थिती असंतुलित होते. त्याही वेळी मंदिरात जाण्याने मनाला उभारी मिळते. गेले सव्वा वर्ष दळणवळण बंदी, निर्बंध, साथीचा संसर्ग, आर्थिक हानी या कारणांनी लोकांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. या निराशाजनक वातावरणातून बाहेर येण्यासाठी आणि भाविकांना दर्शनासाठी मंदिरे खुली करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे लोकांचे मनःस्वास्थ्य जपण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मंदिरे खुली करा, अशी मागणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्टचे कोषाध्यक्ष श्री. महेश सूर्यवंशी यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, सरकारने प्रायोगिक तत्त्वावर सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत मंदिरे खुली करण्याची अनुमती द्यावी. त्यानंतर १५ दिवसांनी परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घ्यावा. महाराष्ट्रातील भाविक, मंदिरांचे व्यवस्थापक, मंदिरावर अवलंबून असलेले व्यावसायिक यांच्या मनात मंदिरे खुली व्हावीत, ही भावना आहे. समाजातील श्रद्धा आणि धारणा लक्षात घेऊन मनोवैज्ञानिक भूमिकेतून मागणी करत आहे.