पुणे, ४ ऑगस्ट – पुण्यात कोरोना संसर्गावर अपेक्षित असे नियंत्रण मिळाले नसल्याने येणारा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना नव्या नियमावली अंतर्गत पुणेकरांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गणेशोत्सवात गणपतीच्या मूर्तीच्या उंचीवरही मर्यादा घालण्यात आली आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीची मूर्ती ४ फुटांहून उंच नसावी, तर घरगुती गणेशाची मूर्ती ही २ फुटांचीच असावी, तसेच गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाच्या नियमांमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आगमन आणि विसर्जन मिरवणूक यांवर बंदी असणार आहे. प्रशासनाने आखून दिलेल्या मर्यादेतच गणेशोत्सवासाठी मंडप उभारले जावेत, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी, अशा सूचना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना करण्यात आल्या आहेत.