कळणे खाण प्रकल्पामुळे घरे, शेती आणि बागायती यांची हानी झाल्याचे प्रकरण
कणकवली – राज्याचे माजी उद्योगमंत्री तथा भाजपचे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी १३ वर्षांपूर्वी कळणे येथील खाण प्रकल्प जनतेच्या माथी मारला. त्या वेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांसह शिवसेनेचा प्रकल्पाला असलेला विरोध झुगारला होता. गावातील शिक्षक, डॉक्टर अशा प्रतिष्ठित नागरिकांना आणि शिवसैनिकांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकवून कारागृहात टाकण्याचे काम राणे यांनी केले. या प्रकल्पातून सहस्रो लोकांना रोजगार देण्याचे आमीष दाखवण्यात आले. ‘गेल्या १३ वर्षांत कळणे येथील खाण प्रकल्पाने किती लोकांना रोजगार मिळाला ? किती लोकांची भरभराट झाली ?’, हे राणे यांनी एकदा घोषित करावे. राणे यांनी कळणेवासियांच्या जिवावर बेतलेल्या या खाण प्रकल्पाविषयीची स्वत:ची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.
कळणे खाण प्रकल्पाचा बांध फुटल्याने येथील अनेक घरे, तसेच शेती अन् बागायती यांमध्ये खनिजयुक्त पाणी आणि माती घुसल्याने हानी झाली आहे. तसेच येथील पाण्याचे स्रोतही खराब झाले आहेत. याला खाण प्रकल्प आणण्यासाठी पुढाकार घेणारे केंद्रीय मंत्री राणे हेच सर्वस्वी उत्तरदायी आहेत. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री या पदांचा दुरुपयोग करून राणे यांनी कळणेवासियांना विनाशाच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे, असा आरोप आमदार नाईक यांनी केला.