|
वास्तविक राष्ट्रभक्तांना अशी मागणी करावी लागू नये. केंद्र सरकारनेच स्वतःहून या गोष्टींची नोंद घेऊन राष्ट्रहितार्थ कायदे बनवायला हवेत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
देेहली – भारतावर राज्य करण्यासाठी आणि राष्ट्रभक्तांना चिरडण्यासाठी इंग्रजांनी २०० वर्षांपूर्वी लादलेले कायदे रहित करावेत आणि या देशात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतरविरोधी कायदा, घुसखोरीविरोधी कायदा, गोहत्याबंदी कायदा असे देशहितार्थ कायदे लागू व्हावे, यांसाठी ८ ऑगस्ट या दिवशी देहली येथील जंतरमंतर येथे धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांचे भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ‘या आंदोलनाला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे’, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्राभिमानी आणि धर्माभिमानी अधिवक्ता अश्विनी उपाध्याय आणि राष्ट्राभिमानी वक्ते श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी पुढाकार घेतला आहे.
१. इंग्रजांनी भारतावर राज्य करण्यासाठी अनेक कायदे केले. या कायद्यांनुसार अद्यापही स्वतंत्र भारतामध्ये कारवाई केली जात आहे. ज्या कायद्यांच्या माध्यमातून इंग्रजांनी देशाची लूट केली, या देशाच्या सनातन संस्कृती, शिक्षण पद्धत (गुरुकुल पद्धती) नष्ट केली, या कायद्यांच्या आधारे स्वतंत्र भारतातील काँग्रेस, कम्युनिस्ट आणि फुटीरतावादी सरकारांनी या देशाला लुटले, देशाचा इतिहास पालटला आणि देशाच्या विरोधात षड्यंत्र रचले. या कायद्यांमुळे या देशातील हिंदूंना त्यांच्याच केरळ, काश्मीर आणि बंगाल यांसारख्या राज्यांमधून पलायन करावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर होत आहे. असे कायदे कार्यरत ठेवणे, हे राष्ट्र आणि हिंदु धर्म यांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे असे चुकीचे कायदे रहित करावे, अशी मागणी या आंदोलनामध्ये करण्यात येणार आहे.
२. हे आंदोलन राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्या हितासाठी होत असून या आंदोलनामध्ये माजी सैन्याधिकारी जनरल जी.डी. बक्षी, माजी रॉ अधिकारी कर्नल आर्.एस्.एन्. सिंह, काश्मिरी हिंदूंचे नेते सुशील पंडित, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, भाजपचे नेते कपिल मिश्रा, बंगालमधील हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. देवदत्त मांझी, जम्मू-काश्मीरचे राष्ट्रप्रेमी नेते श्री. अंकुर शर्मा, आध्यात्मिक गुरु पवन सिन्हा, देहली येथील सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचे संस्थापक प्रा. कपिल कुमार, पीडित काश्मिरी हिंदु श्री. ललित अंबरदार, भारतीय इतिहास अनुसंधान आणि तुलनात्मक अभ्यास केंद्राचे अध्यक्ष श्री. नीरज अत्री, उत्तरप्रदेशचे माजी पोलीस महासंचालक विक्रम सिंह, केेंद्रशासनाचे माजी अधिकारी आर्.व्ही.एस् मणि, डासना मंदिरचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती, कालीचरण महाराज, पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तानचे नेते कॅप्टन सिकंदर रिझवी, अभिनेते पूनीत इस्सार, उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी, माजी रॉ अधिकारी एन्.के. सूद, निवृत्त सैन्याधिकारी मेजर गौरव आर्य, चित्रपट निर्माते निर्देशक विवेक अग्निहोत्री आदी राष्ट्रप्रेमींच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.