नगर शहरातील ह.भ.प. मधुकर उपाख्य अण्णासाहेब देशमुख म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली यांचे परमभक्त ! वयाच्या ९२ व्या वर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ११ एप्रिल २०२१ या दिवशी ते विठ्ठलरूपात विलीन झाले. त्यांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त लेख येथे देत आहोत.
१. वारी आणि वारकरी यांच्या सेवेत समरस झालेले अण्णासाहेब !
१ अ. अण्णासाहेबांच्या आपलेपणामुळे प्रतिवर्षी वारकरी न चुकता नगरला येणे
भक्तीचा परमोच्च आनंद घेतांना वारी आणि वारकरी यांच्या सेवेत अण्णासाहेब समरस झाले. आषाढी वारीसाठी पायी निघालेले वारकरी नगर शहरात आले की, ते चहापान, न्याहरी, भोजन आणि मुक्काम यांसाठी दादा चौधरी विद्यालयाजवळील हिमगिरी बंगल्यात पोचत. वारकरी न चुकता येथे येत राहिला, ते अण्णासाहेबांच्या आपलेपणामुळेच !
१ आ. अण्णासाहेबांचे श्रद्धास्थान
अष्टविनायकांमधील मोरगावचा मयुरेश्वर हे अण्णासाहेबांचे कुलदैवत होते. अण्णासाहेबांचे वडील बापूसाहेब यांनी खडीसाखरेच्या चतुर्थीचे व्रत केले. तीच श्रद्धा अण्णासाहेबांच्या अंतरी रुजली. बापूसाहेब देशमुख यांना उत्तर भारतातील स्वामी प्रकाशानंद यांचा कृपाशीर्वाद नगरमध्ये लाभला, तर आळंदीच्या कन्हैय्या आश्रमामधील आनंदाश्रम स्वामींच्या सान्निध्यात अण्णासाहेबांना साधना करण्याचे भाग्य लाभले. त्यामुळे देशमुख घराण्यात गणेशभक्ती आणि विठ्ठलभक्ती यांचा अनोखा संगमच झाला. वारकरी हेच जीवन, असे मानून वारकरी सेवेत जीवनभर कार्यरत राहिलेले अण्णासाहेब वारीतील आनंद मिळवत अनेकांना देत राहिले.
१ इ. अण्णासाहेबांची कीर्तन आणि प्रवचन सेवा
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली यांची संजीवन समाधी असलेल्या आळंदी येथे अण्णासाहेबांनी पहिले प्रवचन करतांनाच माऊलींचा समाधी सोहळा श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभा केला. हे पाहून आनंदाश्रम स्वामींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, इतके ते प्रभावी झाले होते. त्यानंतर अण्णासाहेबांची महाराष्ट्रभर प्रवचने झाली. ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती झालेल्या नेवासा येथील पैस खांब मंदिरातही त्यांनी प्रवचनसेवा केली. ते प्रवचनांसाठी स्वखर्चाने प्रवास करायचे. प्रत्येक एकादशीला ते सद्गुरु आनंदाश्रम स्वामींपुढे उभे राहून कीर्तन सेवा करत असत.
१ ई. अण्णासाहेबांनी केलेली अन्नदान सेवा
ज्येष्ठ कृष्ण एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी यांदिवशी सासवड-जेजुरी मार्गावरील खळद या गावात वारकरी बंधू-भगिनींना दिवस-रात्र अन्नदान करण्याची सेवा अण्णासाहेब करत. यासह माऊलींच्या समाधी सोहळ्यास आळंदीत, तुकारामबीजेला देहूमध्ये आणि नाथषष्ठीला पैठणमध्ये अण्णासाहेबांचे अन्नछत्र चाले. लखमापूरमधील गेंदालाल महाराज पालखी सोहळ्यास २८ वर्षे, डोंगरगणच्या जंगलेशास्त्री पालखी सोहळ्यास २६ वर्षे आणि ताहराबादच्या संत महिपती महाराज दिंडी सोहळ्यास १५ वर्षे अन्नदान करण्याची सेवा अण्णासाहेबांनी निरपेक्षपणे केली.
१ उ. अण्णासाहेबांची लेखनसेवा
आनंदाश्रम स्वामींच्या आज्ञेवरून अण्णासाहेबांनी पसायदानावर सविस्तर निरूपण केले. या पुस्तकास मोठा प्रतिसाद मिळाला. आवृत्तीमागे आवृत्ती काढाव्या लागल्या. आळंदीतील माऊलींच्या ग्रंथविक्री दालनात गेले एक तप (१२ वर्षे) या पुस्तकाचे वितरण चालूच आहे. पसायदानाच्या प्रचार-प्रसाराचे कार्य अण्णासाहेबांनी जीवनभर केले. ज्ञानेश्वर माऊलींचा कर्मयोग आणि गीतेतील १८ व्या अध्यायातील ७८ व्या श्लोकावरचे निरूपण ही अण्णासाहेबांची पुस्तके लोकप्रिय झाली.
२. अण्णासाहेबांचे समृद्ध आध्यात्मिक जीवन !
आनंदाश्रम स्वामींनी प्रसाद म्हणून दिलेली तुळशीची माळ अण्णासाहेबांच्या गळ्यात अखेरच्या श्वासापर्यंत होती. घरातील देवघरामध्ये आनंदाश्रम स्वामींच्या पादुकाही आहेत. अण्णासाहेबांना आलेल्या अनेकविध अनुभूती अण्णासाहेबांचे सुपुत्र निळकंठराव देशमुख यांच्याकडून श्रवण करतांना देहभान हरपते.
३. अण्णासाहेबांचे व्यावसायिक क्षेत्रातील कार्य
अण्णासाहेबांचे वडील चिंतामण तथा बापूसाहेब देशमुख यांनी वर्ष १९१४ मध्ये नगर शहरातील सराफ बाजारात मे. चिंतामण रामचंद्र देशमुख अँड सन्स या नावाने चालू केलेली सराफी पेढी आजही विश्वासाचे नाते जपत जोमाने चालू आहे. अण्णासाहेबांचे सुपुत्र निळकंठ, मुकुंद, अनंत, तसेच नातू दिनेश आणि मयुरेश हे या सराफी पेढीचा कार्यभार घेतला वसा म्हणून जतन करत आहेत. अण्णासाहेबांनी २५ वर्षे अंबिका आईस फॅक्टरीही चालवली. प्रतिदिन ३६ सहस्र किलो बर्फाचे ते उत्पादन करत होते. साड्या विणण्याचे काम करत असलेल्या कारागिरांना सूत उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेबांनी ७-८ वर्षे कॉटन यार्न चालवले.
४. अण्णासाहेबांचा विविध पुरस्कारांनी झालेला सन्मान
गृहस्थाश्रमाच्या यशस्वीतेनंतर त्यांनी आपले जीवन अध्यात्मासाठी समर्पण केले. वेगळेपणाचे ठसे उमटवत उभ्या केलेल्या आदर्शामुळे अनेक संस्थांनी त्यांनी पुरस्काराने गौरवले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या नगर जिल्हा शाखेने जीवनगौरव पुरस्कार देऊन अण्णासाहेबांना सन्मानित केले होते. योग सुखाचे सोहळे ही माऊलींची ओवी नित्य अनुभवलेल्या अण्णासाहेबांचा आदर्श समोर ठेवून जीवन कृतार्थ करूया !
– श्री. मिलिंद चवंडके, नगर