वर्ष २०२० मध्ये विदेशातून भारतावर ११ लाख ५८ सहस्र सायबर आक्रमणे !

वर्ष २०१९ च्या तुलनेत आक्रमणांत ३०० टक्के वाढ !

भारतीय तरुण माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत सर्वाधिक पुढे असतांना भारतावर एवढ्या मोठ्या संख्येने होणारी सायबर आक्रमणे रोखता न येणे लज्जास्पद !

नवी देहली – गेल्या वर्षभरात भारतावर विदेशातून ११ लाख ५८ सहस्र सायबर आक्रमणे करण्यात आली. वर्ष २०१९ मध्ये ही संख्या केवळ ३ लाख ९४ सहस्र इतकी होती. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या ३०० टक्क्यांहून अधिक आहे. यावर्षी जून मासाच्या शेवटपर्यंत विदेशातून ६ लाखांहून अधिक सायबर आक्रमणे झाली आहेत.

१. केंद्र सरकारने राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्राकडून आक्रमणे टाळण्यासाठी संबंधित सरकारी खाती आणि संस्था यांना सूचना दिल्या जातात.

२. सायबर आक्रमणे रोखण्याचे काम ‘इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’मधील तज्ञ करतात. सायबर आक्रमणाचा धोका असलेल्या देशातील ७०० संस्था, यंत्रणा आणि उद्योग यांना या पथकाने याआधीच सावध केले आहे. तसेच ‘आक्रमणे परतवण्यासाठी असलेली यंत्रणा अद्ययावत करा’, अशी सूचना दिली आहे.