मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महापालिकेच्या प्रवेशद्वाराची तोडफोड !

अमरावती शहरातील अस्वच्छता आणि रस्त्यांची दुरवस्था यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न !

अमरावती महापालिके समोर आंदोलन करताना मनसेचे कार्यकर्ते

अमरावती – शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि अस्वच्छता यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले, तसेच महापालिकेच्या प्रवेशद्धाराची तोडफोडही केली. मनसेचे महानगराध्यक्ष संतोष बद्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी संपूर्ण शहरात स्वत: फिरून समस्या सोडवण्याचे आश्‍वासन दिले. (आंदोलनापूर्वीच प्रशासनाने शहरातील समस्या का सोडवल्या नाहीत ? याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)
१. पत्रकारांशी बोलतांना संतोष बद्रे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेच्या क्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्याचे दिवस असतांनाही महापालिका प्रशासनाने स्वच्छतेकडे पूर्णत: दुर्लक्ष केेले आहे. शहरात रोगराई वाढत असून शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. रस्त्यांची डागडुजीही केली जात नाही, त्याचप्रमाणे अनेक भागांत दिवाबत्तीची व्यवस्था नाही. गाजर गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महापालिकेच्या वतीने कोणतीही तणनाशक फवारणी केली जात नाही. (अशी स्थिती आहे, तर या कामांसाठी असलेला पैसा जातो कुठे ? याचे प्रशासनाने जनतेला उत्तर द्यायला हवे ! – संपादक)
२. वरील सर्व प्रश्‍नांवर मनसेच्या वतीने वेळोवेळी महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे; परंतु कुठलेही सकारात्मक पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे अखेर मनसेने आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले, असे बद्रे यांनी सांगितले.