पुणे जिल्ह्यातील सिंहगड रस्ता येथील साधकांना वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पहातांना आलेल्या अनुभूती

१. सौ. अस्मिता आवटी

१ अ. भ्रमणभाषला अडचण असल्याने सर्व उपाय करणे आणि त्यानंतर विनाअडथळा सोहळ्याचे कार्यक्रम पहाता येणे

‘३.७.२०२० पासून माझ्या भ्रमणभाषला अडचण येत असल्याने ‘मला ५.७.२०२० या दिवशी असलेला गुरुपौर्णिमेचा थेट प्रक्षेपित होणारा (ऑनलाईन) कार्यक्रम भ्रमणभाष संचावर पहाता येईल कि नाही ?’, असे वाटत होते. त्यामुळे मी भ्रमणभाष संचावर श्रीकृष्णाचे चित्र लावणे, त्याच्या भोवती कापराचे मंडल घालणे, त्याला उदबत्ती दाखवणे, असे उपाय केले. त्यानंतर गुरुमाऊलींच्या कृपेमुळे कोणताही अडथळा न येता मला भ्रमणभाष संचावर गुरुपौर्णिमेचे दोन्ही कार्यक्रम पहाता आले.

१ आ. दिवसभर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता येणे आणि घरातील प्रकाशामध्ये वाढ होणे

सकाळचा कार्यक्रम पहातांना ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून साक्षात् श्री महालक्ष्मीदेवी गुरुपूजन करत आहे’, असे मला जाणवले. संध्याकाळी काही वर्षांपूर्वी गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेविषयी केलेले मार्गदर्शन दाखवण्यात आले. माझ्या अंतर्मनावर ते कोरले गेले. मला त्या दिवशी घरामध्ये दिवसभर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता आले. मला घरातील प्रकाशामध्ये वाढ झाल्याचे जाणवत होते. केवळ गुरुदेवांच्या अपार कृपेमुळे मला हा अद्वितीय आणि दैदिप्यमान असा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम घरबसल्या अनुभवता आला.

कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीच्या काळात गुरुदेवांच्या कृपेमुळे मी भ्रमणभाषच्या माध्यमातून घरबसल्या व्यष्टी आणि समष्टी साधना करू शकत आहे. यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

२. सौ. श्रद्धा कांबळे

२ अ. गुरुपौर्णिमेच्या आधी दोन दिवस ताप असूनही गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक वेगळीच ऊर्जा अनुभवणे, घरात आनंदी आणि उत्साही वातावरण असणे अन् ‘गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) घरी येणार’, या विचाराने दिवसभर अंगावर रोमांच येणे 

‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी जाग आल्यापासून मला पुष्कळ चैतन्य अनुभवता आले. गुरुपौर्णिमेच्या दोन दिवस आधी मला ताप आणि थकवाही होता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला एक वेगळीच ऊर्जा अनुभवता आली. घरातील सेवा अगदी सहजपणे करता आल्या. घरामध्ये उत्सवाचे आणि पुष्कळच आनंदी वातावरण जाणवत होते. ‘गुरुपौर्णिमेचा उत्सव आपल्या घरात होत असून गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) घरी येणार आणि गुरुपूजन पहायला मिळणार’, या विचारानेच माझे मन अतिशय आनंदून गेले. दिवसभर माझ्या अंगावर रोमांच येत होते. मला कार्यक्रमही व्यवस्थित पहाता आला आणि भावजागृती अनुभवता आली. हे सर्व गुरुमाऊलीच्या कृपेने अनुभवता आले, त्याविषयी तिच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

३.  सौ. चारुलता पानघाटे

३ अ. ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी साक्षात् गुरुदेवच घरी येणार आहेत’, असा भाव ठेवणे आणि कार्यक्रमानंतर वास्तू प्रकाशमय अन् चैतन्यमय झाल्यासारखी वाटणे

‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी साक्षात् गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) माझ्या घरी येणार आहेत’, असा मी भाव ठेवला. कुटुंबातील सर्वांना माझ्या गुरुदेवांचे दर्शन होणार आहे, या विचाराने मला उत्साह वाटून मी सर्वांना सेवेत सहभागी करून घेतले. घरच्यांनीही आनंदाने सेवा केली. आम्ही सर्वांनी मोठ्या दूरचित्रवाणी संचावर एकत्रित बसून गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम बघितला. ही माझ्यासाठी मोठी अनुभूतीच होती. सर्व आनंदी असल्यामुळे वास्तूसुद्धा प्रकाशमय आणि चैतन्यमय झाल्यासारखी वाटत होती. माझ्या मनाची अवस्था निर्विचार आणि आनंदी होती.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक