सांगली – नागरी भागात शिरलेले पुराचे पाणी ओसरू लागले आहे. त्यामुळे चिखल आणि इतर भिजलेले साहित्य यांमुळे रोगराई पसरू नये, यासाठी महानगपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीम गतीने राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील गणपती पेठ, कृष्णामाई घाट, भाजी मंडई, साठेनगर, सिद्धार्थनगर या भागाची पहाणी केली. त्या वेळी त्यांनी हे निर्देश दिले.
डॉ. अभिजीत चौधरी पुढे म्हणाले की, स्वच्छता मोहिमेसाठी आरोग्य पथकांना ज्या भागात स्वच्छता मोेहीम प्राधान्याने राबवणे आवश्यक आहे, त्या ठिकाणी पाठवण्यात यावे. ज्या भागातील ‘ड्रेनेज सिस्टिम’ तुंबली आहे, त्याचा निचरा तातडीने होईल यासाठी प्रयत्न करावेत. महापालिकेच्या वतीने पूर काळात ‘ड्रोन’द्वारे करण्यात आलेल्या चित्रीकरणाच्या आधारे २०२१ ची पूररेषा निश्चित करावी. लॅप्टोस्पायरोसीसची साथ पसरू, नये यासाठी प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप चालू करावे.
महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस या वेळी म्हणाले की, महानगरपालिका क्षेत्रातील ज्या भागातील पाणी ओसरले आहे, त्या भागात महापालिकेची २०० वाहने आणि यंत्रसामुग्री, तसेच २ सहस्र अधिकारी-कर्मचारी यांच्या साहाय्याने स्वच्छता मोहीम चालू करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून आलेले स्वच्छता पथकही कार्यरत झाले आहे.