मिजोराम पोलिसांच्या गोळीबारात आसामचे ६ पोलीस ठार, तर ५० हून अधिक घायाळ !

  • मिजोराम आणि आसाम येथील सीमावादाचे प्रकरण

  • ६ पोलीस ठार, तर ५० हून अधिक घायाळ !

  • स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही देशात राज्यांतील सीमावाद चालू असणे आणि त्यात पोलिसांचे नाहक बळी जाणे, हे भारताला लज्जास्पद ! यास आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत, हे लक्षात घ्या !
  • अशा अंतर्गत कलहामुळे देश कधी एकसंध राहील का ? याचा शत्रूला लाभ न झाल्यासच नवल ! केंद्र सरकारने पुढाकार घेऊन ही समस्या तात्काळ सोडवणे अपेक्षित !

आइजोल – मिझोराम आणि आसाम यांच्यातील सीमावाद पुन्हा एकदा भडकला असून २६ जुलैच्या रात्री आसामच्या कछार क्षेत्रात झालेल्या गोळीबारात आसामचे ६ पोलीस ठार, तर ५० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. घायाळांमध्ये आसाममध्ये कार्यरत असलेले पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर यांचाही समावेश आहे.

हिंसेच्या घटनांवरून आसाम आणि मिझोराम राज्यांचे मुख्यमंत्री सामाजिक माध्यमांतून एकमेकांवर आरोप करत आहेत. मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथंगा यांनी ‘आसामचे पोलीस आमच्या राज्यात येऊन हिंसा करत आहेत’, असा आरोप केला, तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनीही ‘मिझोरामचे पोलीस आसामध्ये येऊन हिंसा करत आहेत’, असा आरोप केला.

१. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून सीमावादावर सामोपचाराने तोडगा काढण्याची सूचना दिली आहे.

२. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आश्वासन दिले असले, तरी त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी ट्वीट केले आहे की, आसाम राज्याच्या पोलिसांचा गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर मिझोरामच्या पोलिसांनी आनंदोत्सव साजरा केला.

३. दोन्ही राज्यांतील पोलिसांसमवेत केंद्रीय राखीव पोलीसदलाच्या तुकड्या तैनात असूनही दोन्ही राज्यांतील पोलिसांनी एकमेकांवर गोळीबार केला.

काय आहे आसाम-मिजोराम सीमावाद ?

आसाम-मिझोराम सीमावाद हा ब्रिटीश काळापासून चालत आला असून १०० वर्षे जुना आहे. दोन्ही राज्यांच्या ठोस सीमा नाहीत, ही या सीमावादातील मुख्य समस्या आहे. गेल्या काही वर्षांपासून हा सीमावाद न रहाता त्याला ‘हिंदु-मुसलमान यांच्यातील वाद’ असे स्वरूप आले आहे. आसामच्या सीमावर्ती भागात असलेले लोक हे प्रामुख्याने बांगलादेशी मुसलमान घुसखोर असल्याचा मिझोरामच्या जनतेचा आरोप आहे. ‘हे घुसखोर मिझोरामच्या भूमीवर अवैधरित्या अतिक्रमण करत आहेत’, अशी मिझोरामच्या सीमावर्ती भागातील हिंदु जनतेला भीती आहे.

आसाममधील कछार, करीमगंज आणि हैलाकांडी हे जिल्हे अन् मिझोरामचे आयझॉल, कोलासिब आणि ममित या जिल्ह्यांमध्ये १६४ किलोमीटर लांब सीमा आहे. सीमावादामुळे ऑगस्ट २०२० आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये सीमेजवळच्या क्षेत्रातील लोकांमध्ये हिंसा भडकली होती. आसामच्या भूमीवर केलेले कथित अतिक्रमण हटवण्याची मोहीम आसाम पोलिसांनी हाती घेतली. तेव्हापासून दोन्ही राज्यांतील सीमावाद पुन्हा भडकला. आता १० जुलैपासून हे प्रकरण पुन्हा पेटले आहे.