धर्मनिष्ठ अधिवक्त्यांनी केलेले साहाय्य आणि साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांना आर्ततेने केलेली प्रार्थना यांमुळे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी सभागृह मिळण्यातील अडथळे दूर होणे

श्री. चंद्रशेखर सिंह

१. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी धर्मशाळेचे आरक्षण करतांना प्रशासनाकडून अनुमती मिळण्यास विलंब होणे आणि त्यासाठी धर्मनिष्ठ अधिवक्त्यांनी साहाय्य करणे

‘वर्ष २०१८ च्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी वाराणसी येथील एका धर्मशाळेचे आरक्षण करायचे होते आणि त्यासाठी प्रशासनाकडून अनुमती घ्यायची होती. ६.७.२०१८ या दिवशी साधकांनी प्रशासनाकडे अनुमतीसाठी अर्ज दिला; परंतु अनुमती मिळण्यास विलंब होत होता. त्यामुळे आम्ही गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचा प्रसार करू शकत नव्हतो. शेवटी आम्ही धर्मनिष्ठ अधिवक्त्यांना अनुमती मिळवण्यासाठी साहाय्य करण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी आम्हाला सभागृह मिळवून देण्यासाठी साहाय्य केले.

२. व्यवस्थापकांनी मंत्री महोदयांकडून आलेली आरक्षणाविषयीची सूचना सांगणे, साधकांनी अडचण सांगूनही व्यवस्थापकांनी ती न ऐकणे आणि सर्वांनी परात्पर गुरु डॉक्टरांचा आर्ततेने धावा केल्यावर त्यांचे अस्तित्व जाणवून मंत्री महोदयांकडून अनुमती मिळणे

त्याच दिवशी आम्ही धर्मशाळेच्या व्यवस्थापकांकडे गेलो. त्यांनी सांगितले, ‘‘मंत्री महोदयांकडून सूचना आली आहे की, ‘१८ सहस्र रुपये भरल्यानंतरच आगाऊ आरक्षण देण्यात येईल. त्यापूर्वी कुणी सभागृहाचे खोल्यांसहित आरक्षण मागितले, तर तुम्हाला तशी कल्पना देऊन त्यांना सभागृह देण्यात येईल.’’ आम्ही अधिकार्‍यांना आमची अडचण सांगितल्यावरही ते ऐकत नव्हते. अशा स्थितीत सर्व साधक परात्पर गुरु डॉक्टरांना शरण जाऊन आर्ततेने धावा करू लागले. त्या वेळी मला सूक्ष्मातून जाणवले, ‘परात्पर गुरु डॉक्टर त्या व्यवस्थापकांच्या जवळ येऊन बसले आहेत आणि त्यांचे चैतन्य संपूर्ण वातावरणात पसरले आहे.’ थोड्या वेळाने व्यवस्थापकांनी पुन्हा मंत्रीमहोदयांना भ्रमणभाष केला आणि त्यांनी अनुमती दिली. ते ऐकून आमची परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. आमची मने प्रफुल्लित होऊन सर्व साधक आनंदी झाले.

अशा प्रकारे सर्व साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांना वारंवार प्रार्थना केल्यामुळे आणि धर्मनिष्ठ अधिवक्त्यांनी प्रयत्न केल्यामुळे २१.७.२०१८ या दिवशी प्रशासनाकडून सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमासाठी अनुमती मिळाली.’

– श्री. चंद्रशेखर सिंह, वाराणसी, उत्तरप्रदेश (१.८.२०१८)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक