प.पू. दास महाराज यांच्या मर्दनाची सेवा करतांना साधकाला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन म्हणून प.पू. दास महाराजांनी साधकांना त्यांच्या चुका सांगण्यास आरंभ करणे

प.पू. दास महाराज

‘एकदा प.पू. दास महाराज (प.पू. बाबा) परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटायला गेले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही साधकांना त्यांच्याकडून झालेल्या चुका सांगा.’’ तेव्हा प.पू. दास महाराज म्हणाले, ‘‘साधक म्हणजे आपलीच बाळे आहेत. त्यांच्या चुका आपण पोटात घालायच्या नाहीत, तर कुणी घालायच्या ? त्यांना आपणच समजून घेतले पाहिजे.’’ त्यावर परात्पर गुरु डॉक्टर त्यांना म्हणाले, ‘‘आपण त्यांना चुका सांगितल्या नाहीत, तर त्यांच्यात पालट होणार नाही. ते तसेच रहाणार.’’ त्या दिवसापासून प.पू. दास महाराजांनी साधकांच्या चुका सांगण्यास आरंभ केला. खरेतर प.पू. दास महाराजांनी अन्य संप्रदायानुसार साधना केली आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी परात्पर गुरुदेवांना गुरु मानून ते सांगतील, तशी साधना चालू केली. त्यामुळे प.पू. दास महाराजांना सनातन संस्था शिकवत असलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेची थोडीफार माहिती आहे. असे असतांना त्यांनी साधकांना चुका सांगण्यास आरंभ केला.

२. प.पू. दास महाराजांचा प्रांजळपणा अनुभवणे आणि त्यांचा अहं अल्प असल्याचे लक्षात येणे

प.पू. बाबांचा मोठा अपघात झालेला असल्याने त्यांचा उजवा पाय अधू आहे. त्यांना जिना चढायला जमत नाही. एकदा प.पू. बाबांनी आम्हाला सांगितले, ‘‘मी पायर्‍या चढून दोन माळे वर आलो. नंतर माझा पाय दुखायला लागला; म्हणून मी चिकित्सालयातून आधुनिक वैद्यांना बोलावले. आधुनिक वैद्यांनी मला औषधे दिली. तेव्हा मी मुद्दाम आधुनिक वैद्यांना जिने चढून आल्याचे सांगितले नाही; कारण त्यांना ते चांगले वाटले नसते.’’ या प्रसंगातून माझ्या लक्षात आले, ‘प.पू. बाबांमध्ये प्रांजळपणा आहे आणि त्यांचा अहं अल्प आहे.’

३. अनेक व्याधी झालेल्या असतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर साधकांसाठी नामजप करणारे प.पू. दास महाराज !

प.पू. दास महाराज प्रतिदिन सकाळी एक घंटा आणि संध्याकाळी एक घंटा, असे दोन घंटे साधकांसाठी नामजप करण्यासाठी बसतात. ते आम्हाला सांगतात, ‘‘मला मधुमेह आहे. त्यामुळे मला सारखे लघवीला जावे लागते. मला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. माझ्या पायाचा मोठा अपघात झालेला आहे. या सर्व व्याधींमुळे मला एक घंटा नामजपाला बसणे शक्यच नाही; पण तो खोलीत बसलेला श्रीमन्नारायण (परात्पर गुरु डॉक्टर) आहे ना, तोच माझ्या जागी बसलेला असतो; म्हणून मला हे सर्व त्रास होत नाहीत. संत साधकांसाठी नामजप करायला बसतात. तेव्हा संतांच्या माध्यमातून तेच (परात्पर गुरु डॉक्टर) साधकांवर नामजपादी उपाय करत असतात.’’

४. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीमन्नारायण आहेत’, असा प.पू. दास महाराजांचा भाव असणे

एकदा प.पू. बाबांनी सांगितले, ‘‘एकदा मला वाटले, ‘आपण साधकांसाठी आणखी एक घंटा नामजप करायला पाहिजे. प्रतिदिन ३ घंटे साधकांसाठी नामजप करायला हवा.’ काही दिवसांनी परात्पर गुरु डॉक्टरांना भेटल्यावर मी त्यांना याविषयी विचारले. तेव्हा त्यांनी ‘हो. चालेल’, असे सांगितले. मी त्यांना म्हणालो, ‘‘तुमच्याच कृपेने मी नामजपाला बसू शकतो.’’ त्यावर गुरुदेव म्हणाले, ‘‘तुमच्या मनात आधी नामजपाला बसण्याचा विचार आला; म्हणून तुम्ही बसू शकता.’’ हा प्रसंग सांगतांना प.पू. बाबा मला म्हणाले, ‘‘बघा, ते श्रीमन्नारायण आहेत; म्हणून त्यांनी ओळखले की, माझ्या मनात हा विचार आधी आला होता. जर इतर कुणी असते, तर त्याला कसे कळले असते ?’’

५. प.पू. दास महाराजांनी सांगितलेली परमेश्वराची महती !

मी प.पू. बाबांना म्हणालो, ‘‘बाबा, तुम्हाला एवढा वेळ नामजप करण्यासाठी बसायला जमेल का ?’’ तेव्हा प.पू. बाबा म्हणाले, ‘‘अरे, हा देह आमचा नाही. परमेश्वराचा आहे. आम्ही तो भाड्याने आणलेला आहे आणि परमेश्वराचा मोठेपणा असा की, तो भाडेही घेत नाही.’’

६. वयोवृद्ध असूनही प.पू. दास महाराजांनी रामनाथी आश्रमातील श्री भवानीदेवीच्या मंदिरातील विधींसाठी पहाटे ५ वाजता उपस्थित रहाण्याची सिद्धता दर्शवणे, त्या दिवशी विधी उशिरा चालू होणे आणि ‘माझी काळजी केवळ मारुतीच घेऊ शकतो’, असे प.पू. दास महाराजांनी सांगणे

श्री. अजित महांगडे

एकदा रात्री मी बाबांची मर्दनाची सेवा करत होतो. रामनाथी आश्रमामध्ये नवीनच बांधलेल्या श्री भवानीदेवीच्या मंदिरात काही विधी होणार होते. तेव्हा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ प.पू. बाबांना म्हणाल्या, ‘‘बाबा, पहाटे ५ वाजता विधी आहेत. तुम्हाला तेथे यायला जमेल का ?’’ त्यावर प.पू. बाबा म्हणाले, ‘‘ताई, तुम्ही आज्ञा करा. मी उपस्थित राहीन.’’ प.पू. बाबांचे वय ७८ वर्षे आहे, तसेच त्यांच्या एका पायाचा अपघात झालेला असल्याने तो अधू आहे. त्यामुळे मी प.पू. बाबांना विचारले, ‘‘प.पू. बाबा, तुम्हाला एवढ्या पहाटे उठून जायला जमेल का ?’’ त्यावर प.पू. बाबा म्हणाले, ‘‘श्री भवानीदेवी आमची कुलदेवता आहे आणि मला विधींसाठी बोलावले आहे, म्हणजे तेथे जाणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे आपण जायला पाहिजे.’’

दुसर्‍या दिवशी काही अडचणींमुळे विधी पहाटे ५ ऐवजी सकाळी १०.३० वाजता चालू झाले. त्या रात्री मी मर्दनाच्या सेवेला गेल्यावर प.पू. बाबांना म्हणालो, ‘‘बाबा, बरे झाले विधींची वेळ पुढे गेली. तुमची धावपळ झाली नाही.’’ त्यावर प.पू. बाबा त्यांच्या देवघरातील पूजेतील मारुतीच्या चित्राकडे बोट दाखवून मला म्हणाले, ‘‘माझी काळजी केवळ हाच (मारुतीच) घेऊ शकतो. या देहाची काळजी मनुष्य घेऊ शकत नाही. देवच घेऊ शकतो.’’

७. प.पू. दास महाराजांच्या सेवेतील एका साधकाने त्यांच्यासमोर नेहमी खाली बसणे आणि त्यांनी ‘आसंदीवर बसल्याने अहं वाढत असल्याने संतांसमोर कधीही आसंदीवर बसू नये’, असे सांगणे

काही दिवसांनी श्री. अनिकेत जमदाडे हा साधक प.पू. बाबांची सेवा करू लागला. तेव्हा प.पू. बाबा आम्हाला त्याच्याविषयी सांगतांना म्हणाले, ‘‘हा माझ्याकडे आल्यावर नेहमी खाली बसतो. तो कधीच आसंदीवर बसत नाही. गुरु किंवा संत यांच्यासमोर कधीही आसंदीवर बसू नये. संतांनी सांगितले, तरच बसावे. खाली बसल्याने अहं न्यून होतो. आसंदीवर बसलो की, अहं वाढला म्हणून समजायचे.’’

८. पावसामुळे आश्रमातील रस्त्यावरील माती वाहून जात असलेली पाहून प.पू. दास महाराजांनी साधकांकडून रस्त्यावरील पाणी अडवण्याची कृती करवून घेणे 

आश्रमात एके ठिकाणचे बांधकाम चालू होते. त्यामुळे काही ठिकाणी माती उकरून ठेवलेली होती. एकदा पाऊस पडत असल्याने ती माती वाहून खाली येऊ लागली. तेव्हा प.पू. बाबांनी आम्हाला सांगितले, ‘‘संबंधित साधकांना लगेचच संपर्क करून बोलवा आणि त्यांना पाणी अडवायला सांगा.’’ प.पू. बाबांनी ते साधक येईपर्यंत पाठपुरावाही केला. ते म्हणाले, ‘‘जर ही माती अशीच वहात राहिली, तर ती रस्त्यावर येणार आणि चिखल होणार. या रस्त्यावरून आपल्या गाड्या जातात. त्या घसरू शकतात. ही माती तशीच वाहून मुख्य फाटकाजवळ जाणार आणि साधकांना ती स्वच्छ करावी लागणार. बांधकामाच्या संदर्भातील सेवा करणारे साधक दुसरीकडे असतात. तेथे बसून ही गोष्ट त्यांच्या लक्षात येऊ शकत नाही. आपण त्यांना सांगायला पाहिजे.’’ बांधकामाच्या संदर्भातील सेवा करणार्‍या साधकांनी लगेच येऊन पाणी अडवणे चालू केले; म्हणून प.पू. बाबांनी त्यांच्यासाठी खाऊ पाठवला.’

– श्री. अजित महांगडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.७.२०२०)

संतच देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतात !

‘मनुष्य स्वार्थी आहे. त्याला देवाने एवढे सर्व दिले आहे, तरी त्याविषयी तो भगवंताला कधी साधा धन्यवादही देत नाही. देवता तशा नाहीत. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. त्याने एवढी गोड फळे निर्माण केली; पण त्याने स्वतः कधी त्यांचा आस्वाद घेतला नाही. त्याने ते सर्व मनुष्याला दिले आणि मनुष्य त्याला साधा धन्यवादही देत नाही. खरेतर संतच देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतात.’

– प.पू. दास महाराज (१५.६.२०२०)

प.पू. दास महाराजांनी ‘उत्तम साधक, सामान्य साधक आणि कनिष्ठ साधक’ यांची सांगितलेली लक्षणे

१. उत्तम साधक : ‘जो गुरूंनी सांगण्याआधी त्यांच्या मनातील ओळखून त्याप्रमाणे कृती करतो, तो उत्तम साधक असतो.

२. सामान्य साधक : जो गुरूंनी सांगितल्यावर कृती करतो, तो सामान्य साधक असतो.

३. कनिष्ठ साधक : जो गुरूंनी वारंवार सांगूनही ऐकत नाही, तो कनिष्ठ साधक असतो.’

– श्री. अजित महांगडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.७.२०२०)