ओल्ड गोवा येथील रेल्वेमार्गावरील बोगद्यात माती कोसळल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली

प्रातिनिधिक चित्र

पणजी, १९ जुलै (वार्ता.) – मुसळधार पावसामुळे करमळी येथे थिवी रेल्वेस्थानकाच्या बाजूने असलेल्या बोगद्यात माती कोसळली. त्यातच पावसाचे पाणी साठल्याने रेल्वेरूळांवर चिखल निर्माण झाल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबली. यामुळे या मार्गावरून जाणार्‍या ७ रेल्वेगाड्या वेगवेगळ्या रेल्वेस्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या आणि इतर रेल्वेगाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या, तसेच पेडणे रेल्वेस्थानक ते मडगाव रेल्वेस्थानक या मार्गावरील स्थानकांवर उतरणार्‍या रेल्वे प्रवाशांसाठी पेडणे ते मडगाव अशी बससेवा चालू करण्यात आली. हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम् डेली स्पेशल, अमृतसर जंक्शन – कोचुवेली विकली एक्सप्रेस, एर्नाकुलम् जंक्शन-लोकमान्य टिळक दुरांतो बी विकली स्पेशल, कोचुवेली- पोरबंदर विकली स्पेशल आणि एर्नाकुलम् जंक्शन – अजमेर जंक्शन विकली एक्सप्रेस या गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या.

१८ जुलै या दिवशी कोकणकन्या या रेल्वेगाडीतील प्रवाशांना थिवी स्थानकावरून मडगाव स्थानकापर्यंत, तर ‘राजधानी’ या रेल्वेगाडीने आलेल्या प्रवाशांना पेडणेपासून मडगाव स्थानकापर्यंत बसने नेण्यात आले. त्याचप्रमाणे १९ जुलै या दिवशी मडगावहून सुटणार्‍या मांडवी एक्सप्रेस या रेल्वेगाडीने जाणार्‍या प्रवाशांना मडगावहून थिवीपर्यंत बसने नेण्यात आले आणि दुपारी १२ वा थिवीहून छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत जाणारी रेल्वेगाडी सोडण्यात आली. १९ जुलै या दिवशी मडगाव ते हजरत निजामुद्दीन ‘राजधानी’ रेल्वेगाडीने जाणार्‍या प्रवाशांना मडगाव येथून पेडणे स्थानकापर्यंत बसने नेण्यात आले आणि तेथून ती रेल्वेगाडी सोडण्यात आली.