‘न भूतो न भविष्यति’ अशा झालेल्या वर्ष २०२० मधील गुरुपौर्णिमेच्या वेळी पुणे येथील साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘सद्यःस्थितीत कोरोनामुळे दळणवळण बंदी असल्याने प्रतिवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमा सोहळ्यात सहभागी होता येणार का ?’, असे सर्वांना वाटत होते; मात्र अशा परिस्थितीत श्रीविष्णुरूपी कृपाळू गुरुमाऊलींच्या साधकांवर असलेल्या अपार प्रीतीमुळे प्रत्येक साधकाला या वर्षीची गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा अनुभव घेता आला. वर्ष २०२० मध्ये झालेल्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमेचा प्रत्येक साधकाने घरात राहून आनंद अनुभवला. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ सेवांमध्ये, तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुणे येथील साधकांनी अनुभवलेला गुरुकृपेचा वर्षाव अनुभूतींच्या रूपात येथे देत आहोत.

गुरुपौर्णिमा

सौ. अनुराधा तागडे

१. गुरुपूजनाच्या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन झाल्यावर ‘घरात देवीच अवतरली आहे’, असे वाटणे

‘या वर्षीची गुरुपौर्णिमा आगळीवेगळी झाली. पूर्वी सभागृहात गुरुपौर्णिमा असतांना अनेक साधकांना सेवा वाटून दिल्या जायच्या. यावर्षी स्वच्छता आणि शुद्धी करणे, पूजेची सिद्धता करणे, रांगोळी काढणे, अशा सर्वच सेवा घरातच वाटून घेतल्यामुळे सेवा करतांना आम्हाला वेगळाच आनंद जाणवत होता. ‘गुरुदेव घरी येणार’, हा विचारच मनाला आनंद देणारा होता. गुरुतत्त्वाची रांगोळी काढली होती. गुरुकृपेने घराच्या बागेत २ हार होतील, एवढी जुईची फुलेही मिळाली. गुरुपूजनाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन झाले. तेव्हा ‘घरात देवीच अवतरली आहे’, असे मला वाटले. मला पुष्कळ चैतन्य आणि प्रकाश जाणवत होता. आम्हा सगळ्यांचा कृतज्ञताभाव जागृत झाला.

२. ‘गुरुदेवांनी विश्वातील सर्वांना एकाच वेळी दर्शन दिले’, या विचाराने माझा कृतज्ञताभाव जागृत होणे

संध्याकाळी कार्यक्रमाच्या वेळी ‘गुरुदेव घरी येणार’, या भावाने घराला सूक्ष्मातून झेंडूच्या फुलांच्या माळा लावल्या. दिवाळीप्रमाणे सर्वत्र पणत्या लावल्या. फुलांच्या पायघड्या घातल्या. ‘गुरुदेवांनी विश्वातील साधक, जिज्ञासू, हितचिंतक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांच्या घरी सर्वांना एकाच वेळी दर्शन दिले’, या विचाराने माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.

३. स्वतःच्या आणि साधकांच्या हृदयात गुरुपादुकांचे दर्शन होणे

एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात ‘गुरुदेवांचे अखंड स्मरण करूया’, असे ध्येय दिले होते. तेव्हा ‘माझ्या डोक्यावर गुरुदेवांच्या चरणपादुका आहेत’, असे मला जाणवले. ‘माझ्या हृदयात चरणपादुका असून मी त्यांना साष्टांग दंडवत घालत आहे’, असे मला जाणवले. मी नामजप करतांना मला सनातनच्या अनेक संतांचे आणि त्यांच्या हृदयात गुरुपादुकांचे दर्शन घडले. मला ज्या साधकांचे स्मरण होत होते, त्यांच्याही हृदयात मला गुरुपादुकांचे दर्शन होत होते. त्या दिवशी मी सेवेनिमित्त ज्या साधकांशी बोलले, तेव्हाही मला अशीच अनुभूती आली. त्या दिवशी मला सर्वत्र गुरुपादुकांचे दर्शन होत होते.

४. एक साधिकेने मला सांगितले, ‘‘गुरुपौर्णिमेपासून घरात चांगले वाटत आहे. माझे यजमान आणि मुलगा यांनी नामजप चालू केला आहे.’’

५. एक साधक मला म्हणाले, ‘‘मला सारखा नामजप करावा’, असे वाटत आहे आणि आनंद मिळत आहे.’’ हे ऐकून ‘गुरुदेवांचे निर्गुण तत्त्व समाजात किती मोठ्या प्रमाणात कार्यरत झाले आहे’, याची मला जाणीव झाली.

सौ. नेहा मेहता

प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर अर्पणासाठी काही वाचकांना संपर्क करण्याची सेवा मिळणे

‘गुरुपौर्णिमेच्या वेळी अर्पण मिळवण्यासाठी मीही प्रयत्न करायला हवेत’, असा विचार मनात येत होता. ‘मी अर्पण मिळवण्यासाठी कधी प्रयत्न केले नाहीत. मला बोलायला जमेल का ?’, असे नकारात्मक विचार माझ्या मनात येत होते. त्या वेळी मी प.पू. गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना केली. त्यानंतर मला अर्पण घेण्यासाठी काही वाचकांचे संपर्क क्रमांक मिळाले. त्या वेळी ‘देवच मला साहाय्य करत आहे’, हा विचार येऊन माझा भाव जागृत झाला. प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर आतून आवाज आला, ‘तू अर्पण स्वतःसाठी मिळवणार आहेस का ? देवासाठीच मिळवणार आहेस ना ? मग तिथे प्रतिमा ठेवायला नको.’ तेव्हा माझा उत्साह वाढला. त्यानंतर सौ. फलफलेकाकूंनी मला ‘अर्पण घेतांना कसे बोलायचे ? माहिती कशी सांगायची ?’, हे सविस्तर सांगितले. मी त्यानुसार वाचकांना भ्रमणभाष केल्यावर मला आनंद मिळाला. प्रत्येक संपर्क करण्याआधी देवाने माझ्याकडून प्रार्थना आणि नंतर कृतज्ञताही व्यक्त करून घेतली.

ही सेवा झाल्यानंतर ‘देवाला सेवा आवडली असेल ना ?’, असा विचार माझ्या मनात आला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘धर्मकार्यासाठी जाहिराती आदी अर्पण मिळवणे, ही समष्टी साधना !’ हा ग्रंथ प्रकाशित केला. तो वाचून मनात आलेल्या प्रश्नाला देवानेच ‘अर्पणसेवा ही देवाचीच सेवा आहे’, असे उत्तर दिले’, असे वाटून कृतज्ञता वाटली.’

सौ. तृप्ती अतुल कोळसकर

१.  श्री गुरूंचा श्लोक म्हणत असतांना ‘प.पू. गुरुदेव सूक्ष्मातून घराचे दार उघडून घरात आले आणि संगणकावर चालू असलेल्या गुरुपूजनात विलीन झाले’, असे दिसणे

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन चालू असतांना घराचे दार लोटलेले होते. श्री गुरूंचा श्लोक म्हणत असतांना ‘प.पू. गुरुदेव सूक्ष्मातून घराचे दार उघडून घरात आले आणि संगणकावर चालू असलेल्या गुरुपूजनात विलीन झाले’, असे दिसले. ते शेजारून चालत जातांना माझे मन पुष्कळ स्थिर होऊन मला निर्विचार स्थिती अनुभवता आली.

संध्याकाळी झालेल्या सोहळ्यामध्ये प.पू. गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर ‘न भूतो न भविष्यति’ अशी गुरुपौर्णिमा आहे’, असे मला वाटले. मला घरातील वातावरणातही पालट जाणवला. प.पू. गुरुमाऊली, केवळ तुमच्याच प्रीतीमुळे मला हे अनमोल क्षण अनुभवता आले.

२. प्रार्थना

कशी होऊ उतराई गुरुमाऊली ।
कृतज्ञता पडे थोडकी ।
भाव-भक्तीची भीक घाल मज ।
नको आता काही ।।

सौ. मंदाकिनी कदम

१. शारीरिक त्रास होत असतांना गुरुदेवांच्या कृपेने ‘ऑनलाईन’ सेवा मिळाल्याने कृतज्ञता वाटणे

संभाजीनगरहून पुण्यात आल्यापासून माझ्या शारीरिक त्रासांत (पाय दुखणे, गुडघे दुखणे) वाढ झाली होती. त्यामुळे ‘मला सेवा करता येत नाही’, याची पुष्कळ खंत वाटत असे. या वर्षी गुरुदेवांच्या कृपेने ‘ऑनलाईन’ सेवा मिळाली. मला त्यांच्याच कृपेने हितचिंतक, मैत्रीण आणि नातेवाईक यांना गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची लिंक पाठवता आली. तेव्हा मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली.

२. कार्यक्रम पहातांना निळा प्रकाश दिसणे आणि शरिरावर दैवी कण आढळणे

मी ज्या खोलीत बसून भ्रमणभाषवर कार्यक्रम पहात होते, तिथे मला अधून मधून निळा प्रकाश दिसत होता. प्रार्थनेच्या वेळी आणि सकाळचा कार्यक्रम पहात असतांना माझी पुष्कळ भावजागृती झाली. माझ्या डोळ्यांतून थंडगार अश्रू येत होते. माझा डाव्या पायाचा तळवा आणि टाच, तसेच उजवा पाय आणि हात यांवर मोरपिसी, गुलाबी आणि चंदेरी या रंगांचे १० ते १२ दैवी कण दिसले.

(जुलै २०२०)        

(समाप्त)

  • दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे फॉर्म्युले सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या फॉर्म्युल्याशी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना दैवी कण असे संबोधतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक